गडचिरोली : मोकाट डुकरामुळे भीषण अपघातात नगरसेवकाचा मृत्यू

104

गडचिरोली : मोकाट डुकरामुळे भीषण अपघातात नगरसेवकाचा मृत्यू
– प्रशासन झोपेत, रस्त्यावर मृत्यूचा सापळा
The गडविश्व
गडचिरोली, दि. २८ : शहरातील कारगिल चौक परिसरात गुरुवारी (दि. २७) रात्री सुमारे ९.३० ते १० वाजताच्या दरम्यान मोकाट डुकरामुळे घडलेल्या भीषण अपघातात नगरसेवक तथा सभापती मुक्तेश्वर काटवे (वय ५५) यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. अचानक रस्त्यावर आडवे आलेल्या मोकाट डुकरामुळे दुचाकीवरील नियंत्रण सुटून हा अपघात झाला असे सांगण्यात येत आहे. या घटनेने संपूर्ण शहरात शोककळा पसरली असून सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.
प्राप्त माहितीनुसार, देवराव होळी यांच्या स्वागत समारंभानंतर इंदिरा गांधी चौक येथून मुक्तेश्वर काटवे हे दुचाकीने घरी निघाले होते. कारगिल चौक परिसरात अचानक डुक्कर आडवे आल्याने त्यांची दुचाकी घसरली. या अपघातात त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली व मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाला. अपघात होताच नागरिकांनी तात्काळ मदतीसाठी धाव घेत काटवे यांना जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल केले. डॉक्टरांनी शर्थीचे प्रयत्न केले मात्र डोक्याला झालेल्या गंभीर मारामुळे व अतिरक्तस्रावामुळे उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी स्पष्ट केले.

प्रशासनाच्या निष्क्रियतेवर संताप

शहरात मोकाट डुकरांचा तसेच इतरही मोकाट जनावरांचा हैदोस दिवसेंदिवस वाढत असून रस्ते नागरिकांसाठी मृत्यूचे सापळे बनत आहेत. मोकाट जनावरांचा तातडीने बंदोबस्त करण्यात यावा, अशी मागणी नागरिकांकडून सातत्याने होत असतानाही नगर परिषदेचे दुर्लक्ष सुरू असल्याचा आरोप होत आहे. यापूर्वीही मोकाट डुकरांमुळे अपघात घडले आहेत मात्र ठोस कारवाई न झाल्याने अखेर एका नगरसेवकाचा जीव गेला, अशी तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली जात आहे.
‘आता तरी प्रशासन जागे होणार का, की आणखी बळींची वाट पाहणार?’ असा संतप्त सवाल स्थानिक नागरिकांमधून उपस्थित होत असून, मोकाट जनावरांच्या प्रश्नावर तातडीने कडक उपाययोजना करण्याची मागणी जोर धरत आहे.

#thegdv #thegadvishva #gadchirolinews #gadchirolipolice #accident #Gadchiroli #RoadAccident #StrayPigs #MunicipalCouncillor #MokaatJanawar #UrbanSafety #CivicNegligence #PublicSafety #LocalNews #MaharashtraNews

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here