कोरची : चारचाकीसह लाखोंचा अवैध दारूसाठा जप्त
– पोलिसांची धडक कारवाई
The गडविश्व
ता. प्र /कोरची, दि. ०३ : दारूबंदी असलेल्या गडचिरोली जिल्ह्यात अवैधरित्या दारूची वाहतूक करणाऱ्यांविरुद्ध कोरची पोलिसांनी कारवाई करत चारचाकी वाहनासह लाखोंचा मद्यसाठा जप्त केला आहे. १ मार्च २०२६ रोजी सायंकाळी कोरची फवारा चौक परिसरात ही कारवाई करण्यात आली.
कोरची पोलीस ठाण्यात महाराष्ट्र दारूबंदी कायदा कलम ६५(अ), ८३, ९८(२) तसेच मोटार वाहन कायद्यानुसार ३/१८१, १३८/१७७ अंतर्गत गुन्हा नोंद करण्यात आला आहे. या प्रकरणी लखन जोहारी भैसा (रा. बेडगाव, ता. कोरची) व महेंद्र सहारे (रा. आमगाव, जि. गोंदिया) यांना ताब्यात घेण्यात आले असून निर्मल अंकालू धनगाये (रा. कोरची) हा आरोपी फरार आहे. वाहनाची कागदपत्रे व विमा सादर न केल्याने मोटार वाहन कायद्यान्वयेही कारवाई करण्यात आली आहे.
पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार, दोन पंचांच्या उपस्थितीत सीजी-०८ एझेड-२४२९ क्रमांकाच्या पांढऱ्या रंगाच्या स्विफ्ट कारची झडती घेण्यात आली. वाहनातून १८० मिली क्षमतेच्या ‘गोवा व्हिस्की’च्या ७०० सीलबंद बाटल्या (अंदाजे किंमत १,४०,००० रुपये) तसेच ५०० मिली क्षमतेच्या ‘किंगफिशर’ कंपनीच्या ३६० बिअर कॅन्स (अंदाजे किंमत १,००,८०० रुपये) असा एकूण २,४०,८०० रुपयांचा अवैध मद्यसाठा आढळून आला. याशिवाय सुमारे ३,५०,००० रुपये किंमतीचे वाहन जप्त करण्यात आले आहे.
गडचिरोली जिल्हा दारूबंदी क्षेत्र असल्याची माहिती असतानाही अवैधरित्या मद्याची वाहतूक केल्याने संबंधितांविरुद्ध गुन्हा दाखल करून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक योगेश पवार करीत आहेत.
ही कारवाई पोलीस निरीक्षकांच्या मार्गदर्शनाखाली एपीआय देशमुख व त्यांच्या पथकाने केली असून दारूबंदी कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी पोलीस दलाने सातत्याने कारवाई सुरू ठेवली असल्याचे स्पष्ट झाले आहे.
#thegdv #thegadvishva #gadchirolinews #gadchirolipolice #crimenews














