आरमोरी : वैनगंगा नदीत बुडून तरुण अभियंत्याचा करुण अंत
– रंगोत्सवावर शोककळा
The गडविश्व
गडचिरोली, दि. ०३ : होळीचा आनंदमयी वातावरणात असतांनाच आज ०३ मार्च रोजी एक दुर्दैवी घटना घडल्याने सणावर दुःखाची छाया पसरली आहे. आरमोरी येथील गायकवाड चौक परिसरातील २५ वर्षीय शुभम नामदेव रामटेके याचा वैनगंगा नदीत बुडून दुर्दैवी मृत्यू झाला. गांगलवाडी टी-पॉईंटजवळ घडलेल्या या घटनेने संपूर्ण शहर हादरले आहे.
प्राप्त माहितीनुसार, मंगळवारी सकाळी सुमारे १० वाजताच्या सुमारास शुभम आपल्या मित्रांसोबत होळीचा रंगोत्सव साजरा केल्यानंतर नदीकाठी आंघोळीसाठी गेला होता. रंग खेळल्यानंतर सर्वजण पाण्यात उतरले मात्र पाण्याचा अंदाज न आल्याने शुभम खोल पाण्यात बुडाला. मित्रांनी तत्काळ मदतीचा प्रयत्न केला व आरडाओरडा करून स्थानिकांना बोलावले. स्थानिकांच्या मदतीने त्याला बाहेर काढण्यात आले परंतु वैद्यकीय तपासणीत डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.
शुभम हा आपल्या कुटुंबातील एकुलता एक मुलगा होता. वडील कबाड व्यवसाय करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होते. प्रतिकूल परिस्थितीतही त्यांनी मुलाला उच्च शिक्षण देऊन अभियंता बनवले. अवघ्या दोन महिन्यांपूर्वीच शुभमला खासगी कंपनीत नोकरी मिळाली होती. कुटुंबाची आर्थिक परिस्थिती सुधारण्याची स्वप्ने पाहणाऱ्या या कष्टाळू तरुणाच्या आकस्मिक निधनाने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
आनंदाच्या रंगांनी नटलेल्या सणाच्या दिवशी घडलेल्या या घटनेमुळे रामटेके कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून नातेवाईक व मित्रपरिवार शोकसागरात बुडाला आहे. सणाच्या उत्साहात नदीकाठी जाताना नागरिकांनी खबरदारी घ्यावी, असा इशाराही या घटनेतून अधोरेखित झाला आहे.
#thegdv #thegadvishva #gadchirolinews #HoliTragedy #VaingangaRiver #Armori #Gadchiroli #DrowningIncident #YoungEngineer #FestivalTurnsFatal #MaharashtraNews #BreakingNews #SadNews














