सिंदेवाहीत कोहळी समाजाचा शक्तिप्रदर्शन मेळावा; ‘प्रथम समाज, नंतर पक्ष’चा निर्धार
– चार जिल्ह्यांतून समाजबांधवांची विक्रमी उपस्थिती; सामाजिक, शैक्षणिक व आर्थिक प्रश्नांवर मंथन
The गडविश्व
सिंदेवाही, दि. २४ : कोहळी समाजाच्या सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक, औद्योगिक आणि संघटनात्मक प्रश्नांवर व्यापक चर्चा करण्यासाठी सिंदेवाही येथे आयोजित करण्यात आलेल्या भव्य लोकप्रतिनिधी मेळाव्याला चार जिल्ह्यांतून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. गोंदिया, भंडारा, चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यांतून मोठ्या संख्येने समाजबांधव, महिला, युवक व ज्येष्ठ नागरिक सहभागी झाल्याने मेळाव्याला शक्तिप्रदर्शनाचे स्वरूप प्राप्त झाले.
मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी माजी आमदार डॉ. हेमकृष्ण कापगते होते. कोहळी समाज विकास मंडळाचे अध्यक्ष प्रकाश बाळबुद्धे, पद्मश्री परशुराम खुणे, दिवाकर निकुरे, गंगाधर परशुरकर, अमोल मुंगमोडे, चामेश्वर गहाने, नाना नाकाडे, सदानंद बोरकर, कांचन गहाने आणि ललित बाळबुद्धे यांची प्रमुख उपस्थिती होती.
‘प्रथम समाज, नंतर पक्ष’चा सूर
मेळाव्यात पक्षभेद आणि राजकीय विचारधारा बाजूला ठेवून समाजहिताला प्राधान्य देण्यावर एकमत झाले. ‘प्रथम समाज, नंतर पक्ष’ या भूमिकेतून समाजाच्या न्याय्य मागण्यांसाठी एकजुटीने पाठपुरावा करण्याची गरज व्यक्त करण्यात आली. समाजाची राजकीय व सामाजिक ताकद अधिक सक्षम करण्यासाठी सामूहिक भूमिका घेण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले.
समाजाची संघटनात्मक बांधणी मजबूत करणे, युवकांसाठी शिक्षण व रोजगाराच्या संधी वाढविणे, उद्योग-व्यवसायाला प्रोत्साहन देणे, सामाजिक परंपरा व कोहळी विवाह पद्धतीचे जतन करणे तसेच विविध प्रलंबित मागण्यांचा शासनस्तरावर सातत्याने पाठपुरावा करण्याबाबत मेळाव्यात चर्चा झाली.
सभागृहाबाहेरही गर्दी
मेळाव्याला मिळालेल्या प्रचंड प्रतिसादामुळे नियोजित सभागृहातील आसनव्यवस्था अपुरी पडली. त्यामुळे सभागृहाच्या तिन्ही बाजूंना अतिरिक्त व्यवस्था करावी लागली. महिला, युवक आणि ज्येष्ठ नागरिकांची लक्षणीय उपस्थिती विशेष ठरली.
माजी आमदार डॉ. हेमकृष्ण कापगते, पद्मश्री परशुराम खुणे, प्रकाश बाळबुद्धे, अमोल मुंगमोडे, दिवाकर निकुरे, विनोद बोरकर, प्रा. डॉ. किरण कापगते, श्यामजी हटवादे, संजय घोनमोडे आणि कल्पना बोरकर यांनी समाजाच्या विविध प्रश्नांवर मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक रमाकांत लोधे यांनी केले. प्रा. सुभाष बोरकर व भूपेश भाकरे यांनी सूत्रसंचालन केले, तर दिवाकर डी. बोरकर यांनी आभार मानले.
‘एकजूट समाजाची, ताकद समाजाची’ या भूमिकेतून पार पडलेल्या या मेळाव्यात कोहळी समाजाच्या संघटनात्मक एकतेचा संदेश देण्यात आला. समाजाच्या प्रश्नांवर सामूहिक भूमिका घेऊन शासनस्तरावर प्रभावी पाठपुरावा करण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.
मेळाव्याच्या यशस्वी आयोजनासाठी चंद्रपूर जिल्हा कोहळी पाटील संघर्ष मंच व कोहळी समाजबांधवांनी विशेष सहकार्य केले.













