कुरखेड्यात राष्ट्रीय महामार्गाचे अर्धवट काम ठरतेय डोकेदुखी

29

कुरखेड्यात राष्ट्रीय महामार्गाचे अर्धवट काम ठरतेय डोकेदुखी
– सात दिवसांत पूर्ण करण्याचे आश्वासन, भाजपा पदाधिकारी व व्यापाऱ्यांची पाहणी
The गडविश्व
ता. प्र/ कुरखेडा, दि. १० : शहरातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गाच्या अर्धवट कामामुळे व्यापारी, वाहनचालक आणि नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे प्रलंबित कामे तातडीने पूर्ण करण्यात यावीत, अशी मागणी भारतीय जनता पार्टीचे तालुकाध्यक्ष व माजी पंचायत समिती सदस्य चांगदेव फाये, नगरपंचायतीचे स्वच्छता व आरोग्य सभापती तथा भाजप शहराध्यक्ष सागर निरंकारी आणि शहरातील व्यापाऱ्यांनी केली आहे.
शहरातील इंडियन ऑइल पेट्रोल पंपासमोरील जुगलकिशोर भैय्या व मनोज प्रधान यांच्या दुचाकी गॅरेजसमोरील नालीचे काम अनेक महिन्यांपासून अर्धवट असल्याने व्यापाऱ्यांना तसेच नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. वारंवार पाठपुरावा करूनही काम पूर्ण करण्यात होत असलेल्या दिरंगाईबाबत व्यापाऱ्यांनी नाराजी व्यक्त केली.
व्यापाऱ्यांच्या तक्रारीनंतर तालुकाध्यक्ष चांगदेव फाये यांनी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांशी दूरध्वनीवर संपर्क साधला. त्यानंतर कंपनीचे व्यवस्थापक भूषण मोहरकर यांच्यासमवेत प्रत्यक्ष स्थळाची पाहणी करण्यात आली. यावेळी प्रलंबित काम तातडीने पूर्ण करण्याची मागणी करण्यात आली. त्यावर व्यवस्थापकांनी सात दिवसांच्या आत नालीचे काम पूर्ण करण्यात येईल, असे आश्वासन दिले.
यावेळी शहरातील इतर अर्धवट कामेही लवकर पूर्ण करण्याची मागणी करण्यात आली. तसेच बायपासमार्गे आरजेवी शाळेकडे जाणारा रस्ता विद्यार्थ्यांच्या व नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने वाहतुकीसाठी सुरळीत करावा, अशी मागणी करण्यात आली. पावसामुळे शहरातील अनेक रस्त्यांवरील खड्ड्यांमध्ये पाणी साचत असून अपघाताचा धोका वाढला आहे. त्यामुळे खड्ड्यांची तातडीने दुरुस्ती करून नागरिकांना सुरक्षित वाहतूक सुविधा उपलब्ध करून द्यावी, अशी मागणीही करण्यात आली.
पाहणीदरम्यान भाजपचे तालुका उपाध्यक्ष भाग्यवान जनबंधू, विनोद नागपूरकर, बंटी देवढगले, व्यापारी जुगलकिशोर भैय्या, मनोज प्रधान तसेच नागरिक उपस्थित होते. शहरातील सर्व प्रलंबित कामे शक्य तितक्या लवकर पूर्ण करून नागरिकांना दिलासा द्यावा, अशी मागणी भाजपा पदाधिकारी व व्यापाऱ्यांनी संबंधित विभागाकडे केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here