मुधोलीत विनापरवानगी ड्रोन उडविणाऱ्यांवर गुन्हा ; कायदा हातात घेतल्यास कठोर कारवाईचा इशारा

40

मुधोलीत विनापरवानगी ड्रोन उडविणाऱ्यांवर गुन्हा ; कायदा हातात घेतल्यास कठोर कारवाईचा इशारा
– भूमी संपादनाबाबत अफवांवर विश्वास ठेवू नका; जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांचे नागरिकांना आवाहन
The गडविश्व
गडचिरोली, दि. १० : चामोर्शी तालुक्यातील मुधोली चेक पोस्ट परिसरातील ‘नो फ्लाइंग झोन’मध्ये विनापरवानगी ड्रोन उडविल्याप्रकरणी आष्टी पोलिसांनी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. तसेच या घटनेदरम्यान काही नागरिकांनी संबंधितांना डांबून ठेवल्याच्या प्रकाराचीही प्रशासनाने गंभीर दखल घेत नागरिकांना कोणत्याही परिस्थितीत कायदा हातात न घेण्याचे आवाहन केले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ९ जुलै रोजी दुपारी मुधोली परिसरात ड्रोन उडविण्यात येत असल्याची माहिती मिळाल्यानंतर आष्टी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. चौकशीदरम्यान संबंधितांकडे ड्रोन उडविण्याची कोणतीही वैध परवानगी नसल्याचे निष्पन्न झाले. याप्रकरणी शिवम कळोळे, सचिन विश्वकर्मा आणि प्रवीण पोटेवार यांच्याविरुद्ध आष्टी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आल्याची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक एम. रमेश यांनी दिली.
दरम्यान, या घटनेच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी अविश्यांत पंडा यांनी नागरिकांना महत्त्वाचे आवाहन केले आहे. चामोर्शी परिसरातील भूमी संपादन प्रक्रियेला पुढील दोन महिन्यांसाठी स्थगिती देण्यात आली असून, सध्या त्यासंदर्भात कोणतीही प्रशासकीय कारवाई सुरू नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
त्यामुळे नागरिकांनी अफवा किंवा गैरसमजांवर विश्वास ठेवू नये, तसेच कोणत्याही प्रकारे कायदा व सुव्यवस्था धोक्यात आणणारे कृत्य करू नये, असे आवाहन त्यांनी केले. कायदा व सुव्यवस्था राखणे ही प्रत्येक नागरिकाची सामूहिक जबाबदारी असून, कायदा हातात घेणे, शांतता भंग करणे किंवा अशा घटनांना प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न करणाऱ्यांविरुद्धही नियमानुसार कठोर कारवाई करण्यात येईल, असा स्पष्ट इशारा जिल्हाधिकाऱ्यांनी दिला आहे.
#thegdv #thegadvishva #gadchirolinews #gadchirolipolice

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here