गडचिरोलीत ३,३०० विधवा महिलांची पेंशन दोन वर्षांपासून ठप्प
– NSAP पोर्टलच्या त्रुटीमुळे लाभार्थी उपासमारीच्या उंबरठ्यावर
The गडविश्व
ता. प्र / कुरखेडा, दि. २३ : केंद्र पुरस्कृत इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा पेंशन योजना (IGNWPS) गडचिरोली जिल्ह्यात कागदोपत्रीच सुरू असल्याचे गंभीर वास्तव समोर आले आहे. जिल्ह्यातील सुमारे ३,३०० हून अधिक BPL धारक विधवा महिलांना गेल्या दोन वर्षांपासून पेंशनचा एकही हप्ता मिळालेला नाही, त्यामुळे या महिलांचा उदरनिर्वाहाचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
या योजनेअंतर्गत पात्र विधवा महिलांना केंद्र सरकारकडून दरमहा ₹३०० आणि महाराष्ट्र शासनाकडून १,२०० असे एकूण १,५०० पेंशन दिली जाते. मात्र NSAP (National Social Assistance Programme) पोर्टलमधील तांत्रिक अडचणी, आधार–बँक खाते सीडिंग व NPCI लिंकिंगमधील त्रुटींमुळे डिसेंबर २०२३ पासून पेमेंट प्रक्रिया पूर्णपणे ठप्प झाली आहे. जिल्हा प्रशासनाच्या ३१ मार्च २०२४ च्या आकडेवारीनुसार IGNWPS अंतर्गत ३,३२५ लाभार्थी नोंदणीकृत असून, त्यापैकी बहुतांश महिलांना गेल्या २४ महिन्यांपासून पेंशन मिळालेली नाही.
पेंशन हाच उत्पन्नाचा एकमेव आधार असल्याने अनेक विधवा महिलांवर उपासमारीची वेळ आली आहे. “नवऱ्याचा २०१९ मध्ये मृत्यू झाला. तेव्हापासून पेंशनवरच संसार चालत होता. दोन वर्षांपासून एक रुपयाही खात्यात आलेला नाही. औषध आणि अन्नासाठी उधारी घ्यावी लागत आहे,” अशी व्यथा कुरखेडा तालुक्यातील एका लाभार्थीने व्यक्त केली. ग्रामीण भागातील बँक शाखांचा अभाव, इंटरनेट सुविधांची कमतरता आणि डिजिटल प्रक्रियेतील अडथळे यामुळे लाभार्थी महिलांना स्वतःहून पोर्टलवर स्टेटस तपासणे किंवा तक्रार नोंदवणेही शक्य होत नाही. तालुका व जिल्हा कार्यालयात वारंवार फेऱ्या मारूनही “पोर्टलची समस्या आहे, वरिष्ठांकडे प्रकरण आहे” असेच उत्तर मिळत असल्याची माहिती आहे.
दरम्यान, आधार सीडिंग व NPCI लिंकिंगमधील त्रुटी, पोर्टल अपडेट न होणे तसेच केंद्राकडून निधी विलंबाने मिळणे ही पेमेंट रखडण्यामागील प्रमुख कारणे असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर स्थानिक सामाजिक कार्यकर्ते व आदिवासी संघटनांनी येत्या आठवड्यात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे.
या प्रकरणाची दखल घेत जिल्हाधिकारी अविशांत पांडा यांनी, ‘प्रलंबित पेंशन तातडीने वितरित करण्यासाठी NSAP च्या नोडल अधिकाऱ्यांशी समन्वय सुरू आहे,’ असे सांगितले आहे. मात्र दोन वर्षांपासून पेंशनविना जगणाऱ्या विधवा महिलांना आश्वासनांपेक्षा प्रत्यक्ष खात्यात जमा होणाऱ्या रकमांचीच प्रतीक्षा आहे, अशी भावना जिल्ह्यात व्यक्त होत आहे.
#thegdv #thegadvishva #gadchirolinews #kurkhedanews













