पालकमंत्री प्रचारात व्यस्त, गडचिरोलीत नवजातांच्या जीवाशी खेळ – दीड महिन्यांपासून ‘रोटा’ लस गायब
– पालक भयग्रस्त, प्रशासन सुस्त
The गडविश्व
गडचिरोली, दि. २३ : अती दुर्गम, मागास व संवेदनशील म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गडचिरोली जिल्ह्यात राज्य सरकारची आरोग्य व्यवस्थेबाबतची उदासीनता पुन्हा एकदा चव्हाट्यावर आली आहे. जिल्ह्यातील शासकीय रुग्णालये, उपजिल्हा रुग्णालये व प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये गेल्या एक ते दीड महिन्यांपासून नवजात बालकांसाठी अत्यावश्यक असलेली ‘रोटा’ लस पूर्णतः अनुपलब्ध आहे. परिणामी नवजात बालकांचे पालक भीतीच्या छायेत असून, जिल्हा प्रशासन मात्र अद्यापही निष्क्रिय असल्याचे चित्र आहे.
ही परिस्थिती अत्यंत गंभीर असून सरकार थेट बालकांच्या जीवाशी खेळत आहे, असा घणाघाती आरोप गडचिरोली जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाडे यांनी केला आहे. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे स्वतः गडचिरोलीचे पालकमंत्री असताना आणि जिल्ह्याला दोन-दोन पालकमंत्री लाभलेले असतानाही नवजातांच्या आरोग्याची अशी दयनीय अवस्था असेल, तर सरकार नेमके करतंय तरी काय? असा संतप्त सवाल त्यांनी उपस्थित केला.
मुख्यमंत्र्यांना निवडणूक प्रचारासाठी वेळ आहे, राजकीय मंचावर भाषणांसाठी वेळ आहे; मात्र आदिवासी, ग्रामीण व अतिदुर्गम भागातील बालकांच्या आरोग्यासाठी वेळ नाही, हे अत्यंत दुर्दैवी व निषेधार्ह असल्याचे ब्राह्मणवाडे म्हणाले.
जिल्ह्यातील रुग्णालयांमध्ये केवळ लसीचाच नव्हे तर औषधांचा तुटवडा, वैद्यकीय साधनसामग्रीचा अभाव आणि ॲम्बुलन्सची तीव्र कमतरता आहे. उपलब्ध असलेल्या अनेक ॲम्बुलन्स नादुरुस्त अवस्थेत धूळखात पडलेल्या आहेत. जिल्हा रुग्णालयातील अद्ययावत सुविधा आजही केवळ कागदावरच असल्याचा आरोप त्यांनी केला.
एकीकडे सरकार गडचिरोलीला ‘स्टील हब’ बनवण्याच्या घोषणा करत आहे, मात्र दुसरीकडे नागरिकांच्या मूलभूत आरोग्य सेवांमध्ये सरकार पूर्णतः अपयशी ठरत आहे. अहेरी येथे मंजूर झालेले डायलिसिस सेंटर अद्याप कार्यान्वित न झाल्याने सिरोंचा, भामरागडसारख्या अतिदुर्गम भागातील रुग्णांना जीव धोक्यात घालून गडचिरोली किंवा चंद्रपूर येथे प्रवास करावा लागत आहे.
राज्य सरकारने तातडीने या गंभीर परिस्थितीची जबाबदारी स्वीकारावी, रोटा लसीचा तात्काळ पुरवठा करावा, जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणा सक्षम करावी आणि नवजात बालकांच्या जीवाशी खेळ थांबवावा, अन्यथा काँग्रेस पक्ष गडचिरोली जिल्ह्यात तीव्र आंदोलन छेडेल, असा इशाराही महेंद्र ब्राह्मणवाडे यांनी दिला आहे.
#thegdv #gadchirolinews #gadchirolipolice













