‘पुरावा द्या, अन्यथा माफी मागा ’ : निविदा आरोपांवर कुरखेडा नगरपंचायत अध्यक्ष–उपाध्यक्ष आक्रमक

189

‘पुरावा द्या, अन्यथा माफी मागा ’ : निविदा आरोपांवर कुरखेडा नगरपंचायत अध्यक्ष–उपाध्यक्ष आक्रमक
The गडविश्व
ता. प्र / कुरखेडा, दि. २३ : स्थानिक नगर पंचायत बांधकाम विभागातील निविदा प्रक्रियेत आर्थिक लाभासाठी नियमबाह्य कारभार झाल्याचा आरोप करणाऱ्या विद्यमान नगरसेवक अ‍ॅड. उमेश वालदे यांच्यावर नगरपंचायत अध्यक्ष अनिताताई बोरकर व उपाध्यक्ष बबलूभाई हुसैनी यांनी जोरदार पलटवार केला आहे. आरोपांबाबत ठोस व सबळ पुरावे सादर करावेत, अन्यथा जाहीर माफी मागावी, तसे न केल्यास १ कोटी रुपयांचा अब्रूनुकसानीचा दावा दाखल करण्यात येईल, असा थेट इशारा मंगळवारी नगरपंचायत सभागृहात आयोजित पत्रकार परिषदेत देण्यात आला.
महाराष्ट्र नगरोत्थान महाअभियान व नागरी दलितेतर वस्ती सुधार योजना सन २०२५–२६ अंतर्गत सुमारे दोन कोटी रुपयांच्या बांधकाम कामांसाठी नगरपंचायत प्रशासनाने निविदा प्रक्रिया राबविली आहे. या प्रक्रियेत अध्यक्ष, उपाध्यक्ष व काही निवडक सदस्यांनी कंत्राटदारांच्या फायद्यासाठी नियमबाह्य निविदा सूचना काढल्याचा आरोप अ‍ॅड. वालदे यांनी प्रशासन, प्रसिद्धी माध्यमे व सोशल मीडियावर केला होता. या आरोपांमुळे समाजात चुकीचा संदेश गेला असून आमची प्रतिमा जाणीवपूर्वक मलीन करण्याचा प्रयत्न झाल्याचा आरोप अध्यक्ष व उपाध्यक्षांनी केला.
पत्रकार परिषदेत स्पष्ट करताना त्यांनी सांगितले की, निविदा प्रक्रिया राबविणे ही पूर्णतः प्रशासनाची जबाबदारी आहे. पदाधिकारी म्हणून आम्ही केवळ प्रक्रिया नियमांनुसार आहे की नाही याचे निरीक्षण करून सभागृहात मंजुरी देतो. संबंधित निविदा प्रक्रिया नियमबद्ध असल्याने स्थायी समितीत तिला मंजुरी देण्यात आली आहे. वैयक्तिक पातळीवर आर्थिक लाभाचे आरोप करणे हे निराधार व बदनामीकारक असल्याचेही त्यांनी ठामपणे सांगितले.
दरम्यान, भाजप गटनेते या नात्याने उपाध्यक्ष बबलूभाई हुसैनी यांनी अ‍ॅड. वालदे यांच्यावर पक्षशिस्तीचा भंग केल्याचा आरोप केला. गटनेत्याच्या निदर्शनास न आणता व पूर्वपरवानगीशिवाय गंभीर आरोप केल्याने जिल्हाधिकारी गडचिरोली यांच्याकडे पक्षविरोधी कार्यवाहीअंतर्गत अ‍ॅड. वालदे यांचे नगरपंचायत सदस्यत्व रद्द करण्याची शिफारस करण्यात येणार असल्याची माहितीही त्यांनी दिली.
निविदा प्रक्रियेवरील आरोप–प्रत्यारोपांमुळे कुरखेडा नगरपंचायतच्या राजकारणात वातावरण तापले असून, या प्रकरणाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
#thegdv #thegadvishva #gadchirolinews #gadchirolipolice #kurkhedanews

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here