जागतिक महिला दिनी आदर्श विवाह ; ओवाळणीची रक्कम ‘मॅजिक’ उपक्रमाला दान
The गडविश्व
भद्रावती, दि. १० : आजच्या काळात विवाह सोहळे म्हणजे अवाजवी खर्च, झगमगाट आणि रूढी-परंपरांचे प्रदर्शन अशी धारणा रूढ होत असताना भद्रावती तालुक्यातील वडाळा येथे भरडे आणि हजारे कुटुंबीयांनी विवेक, समता आणि सामाजिक जाणिवेचा संदेश देणारा आदर्श विवाह सोहळा आयोजित करून समाजासमोर एक वेगळा आदर्श ठेवला. या विवाह सोहळ्यात पाहुण्यांकडून ओवाळणी म्हणून जमा झालेली ३८ हजार ८०७ रुपयांची रक्कम ‘मॅजिक’ उपक्रमाला मदत म्हणून दान करण्यात आली.
जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून ८ मार्च २०२६ रोजी वडाळा येथे स्नेहा शंकर भरडे आणि रोशन दिलीप हजारे यांचा विवाह साधेपणात आणि सामाजिक जाणिवेच्या वातावरणात पार पडला. विवाह प्रसंगी ठेवण्यात आलेल्या ‘मॅजिक डोनेशन बॉक्स’ या संकल्पनेतून पाहुण्यांनी दिलेली ओवाळणी समाजोपयोगी कार्यासाठी देण्याचा निर्णय नवदाम्पत्य व कुटुंबीयांनी घेतला. यावेळी प्रत्येक विवाह सोहळ्यात अशा प्रकारची सामाजिक संकल्पना राबवावी, असे आवाहनही नवदाम्पत्याने उपस्थितांना केले.
वडाळा येथील वधू स्नेहा भरडे हिने बी.एस्सी. (कृषी) पर्यंत शिक्षण पूर्ण केले असून खेमजई येथील वर रोशन हजारे याने एम.एस.डब्ल्यू. पर्यंत शिक्षण घेतले आहे. दोघांचे विचार जुळल्यानंतर त्यांनी विवाहाचा निर्णय कुटुंबीयांसमोर मांडला. वधूचे वडील शंकर भरडे हे सामाजिक परिवर्तनाच्या चळवळीत कार्यरत असल्यामुळे त्यांनी मुलीच्या जोडीदार निवडीच्या स्वातंत्र्याचा सन्मान करत दोन्ही कुटुंबीयांच्या संमतीने हा विवाह घडवून आणला.
या विवाह सोहळ्यात पारंपरिक लग्नांमध्ये आढळणाऱ्या अनेक अवैज्ञानिक प्रथा जाणीवपूर्वक वगळण्यात आल्या. अंतरपाट, स्वस्तिक काढणे, ओंजळीत तांदूळ टाकणे यांसारख्या रूढींऐवजी विवेक, समता आणि मानवी मूल्यांवर आधारित पद्धतीने विवाह पार पडला. विशेष म्हणजे या सोहळ्यात आदिवासी परंपरेतील मंगलाष्टकांचा समावेश करून निसर्ग, परस्पर सन्मान आणि सहजीवनाचे मूल्य अधोरेखित करण्यात आले.
हा विवाह पूर्णपणे हुंडामुक्त पद्धतीने पार पडला. विवाह हा व्यवहार नसून दोन कुटुंबांमधील सन्मानपूर्ण नाते आहे, हा संदेश या उपक्रमातून देण्यात आला. समाजात अजूनही अस्तित्वात असलेल्या हुंडा प्रथेच्या विरोधात हा विवाह प्रेरणादायी ठरला.
विवाह सोहळ्यात बँड-बाजा, भव्य मिरवणूक यांसारख्या खर्चिक परंपरांनाही फाटा देत साधेपणा आणि अर्थपूर्णतेला प्राधान्य देण्यात आले. विवाहापूर्वी व विवाहानंतर लोकगीत आणि लोकसंगीताच्या कार्यक्रमातून सामाजिक ऐक्य, स्त्री-पुरुष समानता आणि मानवी बंधुत्वाचा संदेश देण्यात आला.
दिखाऊ खर्च टाळून समाजोपयोगी कार्यासाठी मदत करण्याचा संकल्पही दोन्ही कुटुंबीयांनी यावेळी व्यक्त केला. त्याअंतर्गत वडाळा व खेमजई गावातील वाचनालयांना आर्थिक मदत करण्याचा मानस त्यांनी जाहीर केला.
भरडे आणि हजारे कुटुंबीयांनी पुढाकार घेऊन आयोजित केलेला हा विवेकी विवाह सोहळा समाजात समता, विवेक आणि सामाजिक परिवर्तनाचा संदेश देणारा ठरला असून सर्व स्तरांतून या उपक्रमाचे कौतुक होत आहे.
#thegdv #thegadvishva #gadchirolinews #gadchirolipolice














