रामाळा–वैरागड मार्गावर हत्तींचा कळप ; वनविभाग अलर्ट मोडवर, नागरिकांना सतर्कतेचा इशारा

58

रामाळा–वैरागड मार्गावर हत्तींचा कळप ; वनविभाग अलर्ट मोडवर, नागरिकांना सतर्कतेचा इशारा
The गडविश्व
आरमोरी, दि.२३ : आरमोरी तालुक्यातील रामाळा–वैरागड मार्गावर बुधवारी (२२ जुलै) सकाळी सुमारे ७ वाजण्याच्या सुमारास २० ते २२ हत्तींचा कळप जंगलातून मार्गक्रमण करताना नागरिकांना दिसून आला. मोठ्या संख्येने हत्तींचा वावर आढळल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून वनविभागाने तातडीने अलर्ट जारी करत नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.
घटनेची माहिती मिळताच आरमोरी वनविभागाचे अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. हत्तींच्या कळपाची खात्री झाल्यानंतर नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने रामाळा–वैरागड मार्गावरील वाहतूक काही काळासाठी बंद करण्यात आली. तसेच हत्तींच्या हालचालींवर वनविभागाचे पथक सातत्याने लक्ष ठेवून आहे.
वनविभागाच्या माहितीनुसार, गेल्या तीन दिवसांपासून वैरागड, रामाळा ते जोगीसाखरा जंगल परिसरात हत्तींचा वावर कायम आहे. त्यामुळे शेतकरी, शेतमजूर तसेच या मार्गाने प्रवास करणाऱ्या नागरिकांनी विशेष खबरदारी घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
सध्या हत्तींचा कळप रामाळा–वैरागड जंगल परिसरात दिवसा थांबलेला असला, तरी सायंकाळी ७ नंतर रात्रीच्या वेळी हा कळप रस्त्यावर, शेतांमध्ये किंवा गावांच्या दिशेने येण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. त्यामुळे नागरिकांनी विनाकारण जंगल परिसरात जाणे टाळावे, हत्ती दिसल्यास सुरक्षित अंतर राखावे, कोणत्याही प्रकारे त्यांना चिथावणी देऊ नये आणि तात्काळ वनविभागाला माहिती द्यावी, असे आवाहन आरमोरी वनविभागाने केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here