देशरक्षण करताना गडचिरोलीचे सुपुत्र शहीद; बीएसएफ जवान सुरेश आंबडर यांना पश्चिम बंगालमध्ये वीरमरण
– कुरखेडा तालुक्यावर शोककळा
The गडविश्व
ता.प्र / कुरखेडा, दि. २४ : देशाच्या सीमांचे रक्षण करताना गडचिरोली जिल्ह्याच्या आणखी एका सुपुत्राने मातृभूमीसाठी सर्वोच्च बलिदान दिले. कुरखेडा तालुक्यातील मरारटोला येथील रहिवासी तथा सीमा सुरक्षा दलाचे (बीएसएफ) जवान सुरेश दुर्गू आंबडर (वय ३५) यांना पश्चिम बंगालमधील भारत-बांगलादेश सीमेवर घुसखोरीविरोधी मोहिमेदरम्यान २३ जुलै रोजी वीरमरण आले. त्यांच्या निधनाच्या वृत्ताने संपूर्ण जिल्ह्यावर शोककळा पसरली असून गावकऱ्यांसह सर्व स्तरांतून हळहळ व्यक्त होत आहे.
सीमेवर घुसखोरी रोखण्यासाठी बीएसएफकडून विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. या मोहिमेअंतर्गत स्मार्ट फेन्सिंग, अत्याधुनिक रडार यंत्रणा, स्पीड बोटी तसेच सुंदरबनसारख्या दुर्गम भागात फ्लोटिंग सीमा चौक्यांच्या माध्यमातून कडेकोट गस्त ठेवली जात आहे. याच मोहिमेदरम्यान संशयित दहशतवाद्यांकडून झालेल्या गोळीबारात जवान सुरेश आंबडर गंभीर जखमी झाले. उपचारादरम्यान त्यांनी अखेरचा श्वास घेत देशासाठी सर्वोच्च बलिदान दिले.
अत्यंत सामान्य शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या सुरेश आंबडर यांनी जिद्द, चिकाटी आणि कठोर परिश्रमाच्या बळावर सीमा सुरक्षा दलात स्थान मिळवले होते. अवघ्या ७० घरांची आणि सुमारे ३०० लोकसंख्या असलेल्या कुरखेडा तालुक्यातील मरारटोला गावातून त्यांनी देशसेवेचे स्वप्न साकार केले. कर्तव्यनिष्ठ आणि शिस्तप्रिय जवान म्हणून त्यांनी आपल्या सेवेत वेगळी ओळख निर्माण केली.
त्यांच्या पश्चात आई-वडील, एक भाऊ, पत्नी आणि एक लहान मुलगी असा परिवार आहे. त्यांच्या वीरमरणामुळे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून संपूर्ण परिसरात शोकाचे वातावरण आहे.
दरम्यान, जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांनी गृह मंत्रालयाकडून वीरमरणाची माहिती प्राप्त झाल्याचे सांगितले. जिल्हा प्रशासन शहीद जवानांच्या कुटुंबाच्या संपर्कात असून त्यांचे पार्थिव लवकरच मूळ गावी आणण्यात येणार आहे. शासकीय इतमामात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार असल्याची माहितीही त्यांनी दिली.
#thegdv #thegadvisha #gadchirolinews #kurkhedanews #breakingnews #BSF #SureshAmbadar #Gadchiroli #Kurkheda #WestBengal #Martyr #BorderSecurityForce #IndiaBangladeshBorder #NationalSecurity #BraveSoldier #Tribute #IndianArmy #BreakingNews #MaharashtraNews #SaluteToHeroes













