गुरु तेग बहादुर शहीदी पर्व : गडचिरोलीत श्रद्धा, समाजएकता आणि जनजागृतीची जोरदार मोहिम

41

गुरु तेग बहादुर शहीदी पर्व : गडचिरोलीत श्रद्धा, समाजएकता आणि जनजागृतीची जोरदार मोहिम
The गडविश्व
आरमोरी, दि. ०२ : श्री गुरु तेग बहादुर यांच्या ३५० व्या शहीदी पर्वानिमित्त महाराष्ट्र शासनाने ७ डिसेंबर रोजी नागपूर येथे आयोजित केलेल्या राज्यस्तरीय कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर गडचिरोली जिल्ह्यात श्रद्धा, समाजएकता आणि जनजागृतीची अभूतपूर्व लाट उसळली आहे. जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित विशेष बैठकीत जिल्हाधिकाऱ्यांनी समाजप्रतिनिधी, गुरुद्वारा समित्या, शैक्षणिक संस्थांचे प्रमुख आणि विविध सामाजिक घटकांना एकत्र आणत या ऐतिहासिक पर्वाचा संदेश प्रत्येक नागरिकापर्यंत पोहोचवण्याचे आवाहन केले.
जिल्ह्यातील गावोगाव, चौक–चौकात, गुरुद्वारे व शैक्षणिक संस्थांत जनजागृती उपक्रम राबवले जात असून गुरु तेग बहादुर साहिबांनी जबरदस्ती धर्मपरिवर्तनाविरोधात केलेल्या त्यागाचे तेज जनमानसात दुमदुमत आहे. शासनाने तयार केलेले डॉ. सतिंदर सरताज यांच्या आवाजातील विशेष गीत आरमोरी, वडसा, लाखांदूर, कुरखेड़ा परिसरात एलसीडी स्क्रीनद्वारे प्रदर्शित करण्यात आले. हे गीत पाहताना नागरिक भावूक होत उपक्रमाचे कौतुक करताना दिसले.
या मोहिमेत सिगलीकर सिख समाज, बंजारा, लुभाना, सिंधी आदी समाजांनी श्रद्धा आणि उत्साहाने सहभाग नोंदवला आहे. प्रचाररथ, शोभायात्रा, रॅलींच्या माध्यमातून विविध समाजांनी गुरु साहिबांच्या शौर्यगाथेचा संदेश प्रत्येक घटकापर्यंत पोहोचवून समाजएकतेचा अनोखा आदर्श घालून दिला आहे.
अभियानाचे प्रमुख मार्गदर्शक प्राचार्य डॉ. लालसिंह खालसा यांनी आरमोरी, वडसा, लाखांदूर आणि कुरखेड़ा येथील शाळांमध्ये जाऊन विद्यार्थ्यांना गुरुजींची प्रेरणादायी शहादत सोप्या आणि हृदयस्पर्शी शब्दांत सांगितली. मुलांमध्ये करुणा, त्याग, देशभक्ती आणि मानवतेची भावना वृद्धिंगत करण्याच्या उद्देशाने हे कार्यक्रम प्रभावीपणे राबवले गेले. अभियानात विजय ठाकरणी, मनोज लालवानी, भूषण राठी आणि प्रीतपाल सिंह टूटेजा यांचे विशेष सहकार्य लाभले.
७ डिसेंबर रोजी नागपूर येथे होणाऱ्या ऐतिहासिक राज्यस्तरीय कार्यक्रमाला गडचिरोली जिल्ह्यातील सर्व समाजबांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन डॉ. खालसा यांनी केले. इच्छुक संगत व सेवादारांसाठी वडसा गुरुद्वाऱ्यातून खास बसची व्यवस्थाही करण्यात आली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here