आरमोरी : वाघाच्या हल्ल्यात महिला ठार, परिसरात भीतीचं वातावरण

103

आरमोरी : वाघाच्या हल्ल्यात महिला ठार, परिसरात भीतीचं वातावरण
The गडविश्व
आरमोरी, दि. ०२ : गावापासून अवघ्या दीड किलोमीटर अंतरावर शेतातील कचरा काढणीचे काम करत असताना वाघाने हल्ला करून एका वृद्ध महिलेला ठार केल्याची धक्कादायक घटना मंगळवार, २ डिसेंबर रोजी दुपारी उघडकीस आली. आरमोरी तालुक्यातील इंजेवारी–देऊळगाव परिसरात या घटनेनंतर तीव्र दहशत पसरली आहे.
मृत महिलेचे नाव कुंदाबाई खुशाल मेश्राम (६५), रा. इंजेवारी असे आहे. रब्बी हंगामासाठी शेतीची मशागत करण्यासाठी त्या मंगळवारी दुपारी आपल्या नातवासह दुचाकीने शेतात गेल्या. पटाच्या दाणी परिसरातील दीड किलोमीटर अंतरावरील शेतात पोहोचल्यावर नातवाने त्यांना उतरवून घराकडे परतला.
दुपारी ४ च्या सुमारास आजीला न्यायला शेतात गेलेल्या नातवाला त्या तेथे न दिसल्याने तो प्रथम घरी परतला; मात्र घरातही आजी नसल्याचे लक्षात येताच तो आईसह पुन्हा शेतात गेला. शोधादरम्यान शेताच्या बांधीत रक्ताचा सडा दिसून आला. अनिष्ट शंकेने त्यांनी परिसरात तपास सुरू केला असता कुंदाबाई तलावाच्या पाळीखाली मृतावस्थेत आढळल्या. वाघाने त्यांच्या मानेचा काही भाग फस्त केल्याचे दिसून आले.
घटनेची माहिती मिळताच गावकरी मोठ्या संख्येने घटनास्थळी जमले. कुटुंबीयांनी तत्काळ वन विभागाला परिस्थितीची माहिती दिली असून विभागाकडून पंचनामा व पुढील उपाययोजना सुरू करण्यात आल्या आहेत.
इंजेवारी-देऊळगाव परिसरात वन्यप्राण्यांच्या वाढत्या वावरामुळे नागरिकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले असून ग्रामस्थांनी वन विभागाकडे तातडीने उपाययोजना करण्याची मागणी केली आहे.
#thegdv #thegadvishva #gadchirolinews #gadchirolipolice #crimenews

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here