– Update दोघांचेही मृतदेह लागले हाती
The गडविश्व
गडचिरोली, २८ ऑगस्ट :तालुक्यातील कठाणी नदीपात्रात हातपाय धुण्यासाठी गेले असता अचानक खोल पाण्यात बुडाल्याची घटना रविवार २७ ऑगस्ट रोजी दुपारी ३.३० वाजताच्या सुमारास घडली. बुडणाऱ्यात विद्युत कर्मचारी मिलिंद चौधरी (३३). रा. नेरी ता.चिमूर जि. चंद्रपूर (हल्ली मुक्काम गडचिरोली), खासगी कामगार चंद्रकांत ठाकरे (२९) रा.काठली अशी त्यांची नावे असून सोमवार २८ जुलै रोजी संध्याकाळ पर्यंत शोधमोहीम राबविली असता चंद्रकांत ठाकरे यांचा मृतदेह दुपारी १ ते २ वाजताच्या सुमारास मिळून आला.
गडचिरोली तालुक्यातील खुर्सा येथील कठाणी नदी किनारी काही विद्युत कर्मचारी आपले काम आटोपून नदी किनारी जेवण करण्याकरिता गेले. दुपारपर्यंत जेवण आटोपले दरम्यान जेवण करून घरी परतण्याच्या वेळेस हातपाय धुण्याकरिता आधी दोघेजण नदीपात्रातील मोठ्या दगडांच्या काठावर बसून हातपाय धुत होते दरम्यान ठाकरे हा पाण्यात उतरल्याने नदीच्या प्रवाहात वाहू लागल्याने यावेळी जवळच असलेले बाकी जण त्याला वाचविण्याकरिता धावू लागले व पाण्यात प्रवेश केला मात्र ठाकरे हा पाण्याच्या प्रवाहात खोलवर पाण्यात बुडाला व चौधरी हे पाण्याच्या प्रवाहानजीक असलेल्या दगडावर बसून होते मात्र ठाकरे यांना वाचवितांना सर्वांचे लक्ष तिकडेच असतांनाच काही वेळाने चौधरी हे सुद्धा तिथून गायब झाले व पाण्याच्या प्रवाहात वाहून गेल्याचे प्रत्यक्षदर्शीने सांगितले. घटनेची माहिती गावकऱ्यांना माहिती होताच गावकऱ्यांनी घनस्थळाकडे धाव घेतली व पोलीसांना घटनेची माहिती दिली. तात्काळ पोलिसांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला. पंचनामा करत पर्यंतच अंधार पडल्याने शोध घेण्यास अडचण होत असल्याने दुसऱ्या दिवशी २८ ऑगस्ट ला सकाळी ९ वाजतापासून शोधमोहीम राबविण्यात आली. यावेळी गावातील नागरिक व इतर उपस्थित होते. यावेळी आपत्ती व्यवस्थापन दलाचे कर्मचारीही शोध घेत होते दरम्यान दुपारी १ ते २ वाजताच्या सुमारास ठाकरे यांचा मृतदेह मिळाला. जिल्हा सामान्य रुग्णालयात शवविच्छेदनकरिता पाठवून मृतदेह कुटुंबांच्या स्वाधीन करण्यात आला. या शोधमोहिमेत विद्युत कर्मचारी चौधरी यांचा थांगपत्ता लागला नाही. मंगळवारी पुन्हा शोधमोहीम राबविण्यात येणार आहे अशी माहिती आहे. यावेळी विद्युत कर्मचारी, अधिकारी, पोलीस कर्मचारी, एसडीआरएफ टीम तसेच गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. सदर घटनेने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे.
विद्युत कर्मचारी मनमिळाऊ, खुर्सावासीयात दुःख
विद्युत कर्मचारी मिलिंद चौधरी हे मागील महिन्यातच खुर्सा-गिलगाव परिसरात नागपूर जिल्ह्यातुन बदली होऊन आले होते. एक महिन्याच्या कालावधी दरम्यान परिसरातील अनेकांशी त्यांच्या मनमिळाऊ स्वभावाने जवळीकता निर्माण झाली होती. गावकऱ्यांमध्ये त्यांच्याबद्दल आपुलकी निर्माण झाली होती हे सदर घटनेनंतरही नागरिकांकडून दिसून आले. घटनेची माहिती मिळताच महिला व पुरुष मंडळीना चटकाच बसला होता असे सुद्धा नागरिकांतून ऐकायला मिळाले. मंगळवारी पुन्हा शोधमोहीम राबविण्यात येणार आहे.
Updated
– अखेर दोन दिवसानंतर विद्युत कर्मचाऱ्याचा मृतदेह मिळाला
२९ ऑगस्ट रोजी सकाळच्या सुमारास शोधमोहीम राबविली असता आंबेशिवणी राममंदिर घाटावर नदीपात्रात विद्युत कर्मचारी मिलिंद चौधरी यांचा मृतदेह तरंगताना आढळून आला. दरम्यान घटनास्थळी पोलिसांना पाचारण करण्यात आले. पोलिसांनी घटनास्थळ गाठून शवविच्छेदनासाठी पाठवून कुटुंबाच्या स्वाधीन करण्यात आले. सुमारे ४ वाजता त्यांच्यावर नेरी येथे अंतीमसंस्कार करण्यात आले. यावेळी महावितरण कर्मचारी यांनी मृतकाच्या पत्नीस आर्थिक मदत केली व पुढील कार्यवाहीसही मदत करण्याचे आश्वासन दिले.