– स्पर्धा परीक्षा सराव पेपरला दुर्गम भागातील विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
The गडविश्व
गडचिरोली, दि. २६ : दुर्गम आणि अतिदुर्गम भागात राहणाऱ्या विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षा मार्गदर्शनाची संधी उपलब्ध करून देण्यासाठी गडचिरोली पोलीस दल आणि यशोरथ स्पर्धा परीक्षा टेस्ट सिरीज, मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने “प्रोजेक्ट उडान” अंतर्गत स्पर्धा परीक्षा सराव पेपर क्र. 06 चे आयोजन करण्यात आले. हा उपक्रम “एक गाव, एक वाचनालय” योजनेच्या माध्यमातून 26 मे रोजी पोलीस मुख्यालयातील शहीद पांडु आलाम सभागृह तसेच जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाणी, उपठाणी आणि पोलीस मदत केंद्रांतील वाचनालयांमध्ये राबविण्यात आला.
या उपक्रमात एकूण ३५०० विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला. भामरागड, अहेरी, एटापल्ली, हेडरी, सिरोंचा यासारख्या अतिदुर्गम भागांतूनही विद्यार्थ्यांनी उत्साहाने सहभाग घेतला. नव्याने स्थापन करण्यात आलेल्या पेनगुंडा पोलीस मदत केंद्रातून १८ आणि नेलगुंडा पोलीस स्टेशनच्या हद्दीतील १९ विद्यार्थ्यांनीही या परीक्षेत भाग घेतला. विविध ठिकाणी सार्वजनिक वाचनालये आणि ग्रामपंचायत कार्यालयांमध्ये परीक्षा केंद्रे उभारण्यात आली होती. विशेष म्हणजे पोलीस मुख्यालयातील सराव परीक्षेमध्ये तब्बल १३०० विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.
या प्रसंगी अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन) एम. रमेश यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की, ही टेस्ट सिरीज म्हणजे केवळ सराव नसून विद्यार्थ्यांच्या आत्मविश्वासाला चालना देणारा एक महत्त्वपूर्ण टप्पा आहे. यामुळे विद्यार्थ्यांना परीक्षेपूर्वीचा अनुभव मिळतो, स्वतःची तयारी तपासता येते आणि कमतरतेवर काम करण्याची दिशा मिळते.
पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांच्या मार्गदर्शनाखाली या उपक्रमाच्या यशासाठी सर्व उपविभागीय अधिकारी, पोलीस ठाण्यांचे प्रभारी, नागरी कृती शाखेचे पोउपनि. चंद्रकांत शेळके तसेच पोलीस दलातील सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांनी महत्त्वपूर्ण योगदान दिले.
स्पर्धा परीक्षेतील गडचिरोलीच्या दुर्गम भागातील विद्यार्थ्यांसाठी ही नवी उमेद ठरणारी पायरी ठरली आहे.
