– कुरखेडा उपविभागात धडाकेबाज कारवाई, ५ लाखांचा मुद्देमाल हस्तगत
The गडविश्व
गडचिरोली, दि. २५ : जिल्ह्यातील अवैध अंमली पदार्थ तस्करीवर अंकुश ठेवण्यासाठी गडचिरोली पोलिसांनी पुन्हा एकदा धडाकेबाज कारवाई करत ५०.५ किलो गांजा जप्त केला आहे. कुरखेडा उपविभागातील मालेवाडा पोलीस मदत केंद्राच्या कार्यक्षेत्रातील दोन वेगवेगळ्या गावांमध्ये ही कारवाई करण्यात आली. कारवाईदरम्यान दोघा तस्करांना अटक करण्यात आली असून, जप्त अंमली पदार्थाची बाजारभावानुसार किंमत ₹५,०५,०३०/- इतकी आहे.
२४ जुलै रोजी स्थानिक गुन्हे शाखेला मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे ही मोहीम राबविण्यात आली. पहिली कारवाई धनेगाव येथे करण्यात आली. संशयित कालीदास पांडुरंग मोहुर्ले (वय ४०, रा. धनेगाव) याच्या घराची झडती घेतली असता, दोन रेघट पांढऱ्या पिशव्यांमध्ये ४०.८२५ किलो गांजा सापडला, ज्याची किंमत अंदाजे ₹४,०८,२५०/- आहे. मोहुर्ले याने विक्रीच्या उद्देशाने हा गांजा साठवून ठेवल्याची कबुली दिली आहे.
दुसरी कारवाई कातलवाडा येथे पार पडली. तारेश्वर भुपाल चांग (वय ३४, रा. कातलवाडा) याच्या वडिलांच्या घरी छापा टाकण्यात आला असता, एका शेंदरी रंगाच्या पिशवीत ९.६७८ किलो गांजा सापडला. सदर मुद्देमालाची किंमत ₹९६,७८०/- असून, विक्रीच्या हेतूने साठवणूक केल्याची कबुली आरोपीने दिली.
दोन्ही प्रकरणांमध्ये पुराडा पोलीस ठाण्यात NDPS कायदा १९८५ चे कलम ८(सी), २०(बी)(ii)(सी) अन्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. अटक करण्यात आलेल्या आरोपींना न्यायालयात हजर केले असता, तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. पुढील तपास पोमकें मालेवाडाचे पोउपनि. आकाश नाईकवाडे करीत आहेत.
ही कारवाई पोलीस अधीक्षक नीलोत्पल, अपर पोलीस अधीक्षक एम. रमेश, सत्य साई कार्तिक, गोकुल राज जी आणि उपविभागीय पोलीस अधिकारी रविंद्र भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. स्थानिक गुन्हे शाखा गडचिरोलीचे पोनि. अरुण फेगडे यांच्या नेतृत्वात सपोनि. समाधान दौड, भगतसिंग दुलत, सरिता मरकाम आणि त्यांचे पथक यामध्ये सहभागी होते.
गडचिरोली पोलिसांची ही कारवाई जिल्ह्यातील अंमली पदार्थविरोधी मोहिमेला मोठी चालना देणारी ठरली असून, अशा कठोर पावलांमुळे तस्करी करणाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
#thegdv #thegadvishva #gadchirolipolice #gadchirolinews #GadchiroliPolice #AntiDrugOperation #NDPSAct1985 #DrugSeizure #CannabisRaid #PoliceAction #CrimeControl #DrugFreeGadchiroli #LawAndOrder
#गडचिरोलीपोलीस #अंमलीपदार्थविरोधीमोहीम #गांजातस्करी
#पोलिसांचीकारवाई #गांजाजप्त #गडचिरोलीबातमी #गुन्हेगारीविरोधात #NDPSAct #पोलीसयश #कुरखेडा













