गडचिरोली : ७८ वर्षांत रस्ता नाहीच! सालईटोल्यात मृतदेह खाटेला बांधून चिखलातून नेण्याची वेळ

123

गडचिरोली : ७८ वर्षांत रस्ता नाहीच! सालईटोल्यात मृतदेह खाटेला बांधून चिखलातून नेण्याची वेळ
The गडविश्व
ता. प्र/ धानोरा, दि. १५ : देशाला स्वातंत्र्य मिळून ७८ वर्षे उलटली, देश विकासाच्या आणि डिजिटल युगाच्या दिशेने वाटचाल करत असताना गडचिरोली जिल्ह्यातील धानोरा तालुक्यातील सालईटोला गावाची अवस्था मात्र आजही दयनीय आहे. जपंतलाई ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या या गावाला अद्याप पक्का रस्ता नसल्याने एका ग्रामस्थाच्या मृत्यूनंतर त्यांचा मृतदेह खाटेला बांधून बांबूच्या सहाय्याने चिखलातून मुख्य रस्त्यापर्यंत न्यावा लागला. या घटनेने गावातील मूलभूत सुविधांची विदारक स्थिती समोर आली आहे.

सालईटोला गावाला जोडणारा पक्का रस्ता नसल्याने पावसाळ्यात ग्रामस्थांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतो. गावात रुग्णवाहिका पोहोचणे कठीण असल्याने एखादी व्यक्ती गंभीर आजारी पडल्यास तिला मुख्य रस्त्यापर्यंत नेण्यासाठीही ग्रामस्थांना चिखलातून वाट काढावी लागते. मृत्यू झाल्यानंतर मृतदेह बाहेर नेतानाही हीच परिस्थिती कायम आहे.

खाटेला दोरी, बांबूचा आधार अन् चिखलातून वाटचाल

ग्रामस्थाच्या मृत्यूनंतर कुटुंबीय आणि गावकऱ्यांनी मृतदेह खाटेला दोरीने बांधला. त्यानंतर दोन बांबूंच्या सहाय्याने खांद्यावर उचलून शेतातील चिखल-पाण्यातून मुख्य रस्त्यापर्यंत नेण्यात आला. तेथून पुढील प्रवासासाठी ट्रॅक्स वाहनाची व्यवस्था करावी लागली. मृतदेह वाहून नेण्यासाठीही गावकऱ्यांना अशी कसरत करावी लागल्याने प्रशासनाच्या विकासकामांवर प्रश्न उपस्थित होत आहेत.

गावाला पक्का रस्ता मिळावा यासाठी ग्रामस्थांनी ग्रामपंचायत, पंचायत समिती तसेच लोकप्रतिनिधींकडे अनेकदा मागणी केल्याचे सांगण्यात येते. मात्र, वर्षानुवर्षे मागणी करूनही रस्त्याचा प्रश्न मार्गी लागलेला नाही.

“गावात कोणी आजारी पडले किंवा मृत्यू झाला, तर आम्हाला शेतातील चिखलातून जीव मुठीत धरून मुख्य रस्त्यापर्यंत जावे लागते. आमच्या गावाला पक्का रस्ता कधी मिळणार?” असा संतप्त सवाल ग्रामस्थांनी उपस्थित केला आहे.

या घटनेनंतर तरी प्रशासन आणि ग्रामपंचायतीने सालईटोला गावाच्या रस्त्याचा प्रश्न गांभीर्याने घेऊन तातडीने कार्यवाही करावी, अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे. आता या मागणीची दखल घेऊन प्रत्यक्ष रस्त्याचे काम कधी सुरू होते, याकडे ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे.
#thegdv #thegadvishva #gadchirolinews #gadchirolipolice #dhanora #Gadchiroli #Dhanora #Salaitola #RoadlessVillage #RuralRoads #GadchiroliNews #MaharashtraNews #VillageDevelopment #RoadConnectivity #RuralDevelopment #GovernmentNeglect #PublicIssues #GadchiroliDistrict #Maharashtra #BreakingNews

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here