गडचिरोली : दोन वाहनांसह २२.९९ लाखांचा मुद्देमाल जप्त
– दोन ठिकाणच्या धडक कारवाईत तिघांविरुद्ध गुन्हे दाखल व अटक
The गडविश्व
गडचिरोली, दि. २ : जिल्ह्यात दारूबंदी असतानाही सुरू असलेल्या अवैध दारू वाहतुकीविरोधात गडचिरोली पोलिसांनी मोठी कारवाई केली. स्थानिक गुन्हे शाखा, गडचिरोली व आष्टी पोलिसांनी दोन वेगवेगळ्या ठिकाणी सापळा रचून दोन चारचाकी वाहनांसह एकूण २२ लाख ९९ हजार ४०० रुपयांचा अवैध दारूसाठा जप्त केला. या प्रकरणात तिघांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले असून, आरोपींना अटक करण्यात आली आहे.
३० जुलै रोजी स्थानिक गुन्हे शाखा व गडचिरोली पोलिसांनी आरमोरी मार्गावर नाकाबंदी करून बलेनो कारमधून अवैध दारूची वाहतूक करणाऱ्या प्रमोद दिलीप भोयर आणि मुकेश प्रकाश बोधलकर यांना पकडले. त्यांच्या ताब्यातून देशी-विदेशी दारूसाठा व कार असा ७ लाख ६० हजार ८०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
त्यानंतर ३१ जुलै रोजी स्थानिक गुन्हे शाखा व आष्टी पोलिसांनी येणापूर येथे नाकाबंदी करून बोलेरो पिकअपमधून दारूची वाहतूक करणाऱ्या अब्दुल फरहान शेख याला ताब्यात घेतले. त्याच्याकडून विविध प्रकारच्या देशी-विदेशी दारूसह वाहन असा १५ लाख ३८ हजार ६०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. आरोपीला अटक करण्यात आली आहे.
दोन्ही प्रकरणांत महाराष्ट्र दारूबंदी कायद्यान्वये गुन्हे नोंद करण्यात आले असून, पुढील तपास गडचिरोली व आष्टी पोलीस करीत आहेत. ही कारवाई पोलीस अधीक्षक एम. रमेश यांच्या आदेशान्वये वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा व संबंधित पोलीस ठाण्यांच्या पथकांनी पार पाडली.













