अल्पवयीन मुलीच्या विनयभंगप्रकरणी आरोपीला ३ वर्षांचा कारावास, १० हजारांचा दंड
– प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश अनिरुद्ध टिकले यांचा न्यायनिर्वाळा
The गडविश्व
गडचिरोली, दि. १ : आरमोरी येथे अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याप्रकरणी आरोपी मंगेश मोहन दुमाणे याला प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाने तीन वर्षांच्या कारावासाची शिक्षा तसेच १० हजार रुपये दंड ठोठावला आहे. दंडाची रक्कम न भरल्यास सहा महिने अतिरिक्त साधा कारावास भोगावा लागणार आहे. प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश अनिरुद्ध टिकले यांनी ३१ जुलै २०२६ रोजी हा निकाल दिला.
ही घटना ३० ऑगस्ट २०२३ रोजी आरमोरी पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडली होती. पीडित अल्पवयीन मुलगी घरी एकटी असल्याची संधी साधून आरोपीने तिचा विनयभंग केल्याचा आरोप होता. या प्रकरणी पीडितेच्या आईने दिलेल्या तक्रारीवरून आरमोरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
गुन्हा दाखल होताच आरमोरी पोलिसांनी तत्काळ कारवाई करून आरोपीला ३० ऑगस्ट २०२३ रोजी अटक केली. तत्कालीन उपविभागीय पोलीस अधिकारी साहील झरकर यांनी प्रकरणाचा तपास पूर्ण केला. तपासादरम्यान आरोपीविरुद्ध सबळ पुरावे मिळाल्यानंतर न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्यात आले.
प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालय, गडचिरोली येथे खटल्याची सुनावणी झाली. पीडिता, फिर्यादी, पंच व अन्य साक्षीदारांचे जबाब तसेच सरकारी पक्षाचा युक्तिवाद ग्राह्य धरून न्यायालयाने आरोपीला भारतीय दंड संहितेच्या कलम ३५४ तसेच अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती (अत्याचार प्रतिबंधक) अधिनियमातील संबंधित कलमांन्वये दोषी ठरविले.
न्यायालयाने आरोपीला तीन वर्षांचा कारावास आणि १० हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. दंड न भरल्यास सहा महिने अतिरिक्त साधा कारावास भोगण्याची तरतूदही करण्यात आली आहे.
या प्रकरणात सरकार पक्षातर्फे सहायक जिल्हा सरकारी वकील सचिन कुंभारे यांनी कामकाज पाहिले. प्रकरणाचा तपास तत्कालीन उपविभागीय पोलीस अधिकारी साहील झरकर यांनी केला. तसेच साक्षीदारांशी समन्वय साधून खटल्याच्या प्रभावी पाठपुराव्यासाठी न्यायालयीन पैरवी अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले.













