अवैध दारू साठ्यावर पोलिसांचा बुलडोझर : आरमोरीतील अनधिकृत इमारत जमीनदोस्त
– १५.६५ लाखांचा मुद्देमाल जप्त केल्यानंतर मोठी कारवाई
The गडविश्व
गडचिरोली, दि. १ : जिल्ह्यात दारूबंदी असतानाही छुप्या पद्धतीने सुरू असलेल्या अवैध दारू विक्री आणि वाहतुकीविरोधात गडचिरोली पोलिसांनी कठोर भूमिका घेतली आहे. आरमोरी येथे अवैध देशी-विदेशी व हातभट्टी दारूचा साठा करण्यासाठी वापरण्यात आलेली इमारत अनधिकृत असल्याचे तपासात निष्पन्न झाल्यानंतर पोलिसांनी नगरपरिषद प्रशासनाच्या समन्वयाने ती इमारत जमीनदोस्त केली. या कारवाईमुळे अवैध व्यवसायांसह त्यांना आश्रय देणाऱ्या अनधिकृत बांधकामांवरही कायद्याचा बडगा उगारला जाणार असल्याचा स्पष्ट संदेश देण्यात आला आहे.
गडचिरोली जिल्ह्यात दारूबंदी लागू असतानाही काही व्यक्तींकडून अवैधरित्या दारूची विक्री, साठवणूक आणि वाहतूक करण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे निदर्शनास येत आहे. या पार्श्वभूमीवर पोलीस अधीक्षक एम. रमेश यांनी अवैध दारू व्यवसायात सहभागी असलेल्यांविरोधात प्रभावी आणि कठोर कायदेशीर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत.
त्यानुसार, १० जून २०२६ रोजी सहायक पोलीस अधीक्षक अनिकेत हिरडे यांना गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळाली होती की, सुनिल जिभकाटे हा आपल्या साथीदाराच्या मदतीने चारचाकी वाहनातून बाहेरील जिल्ह्यातून अवैधरित्या देशी-विदेशी दारूची वाहतूक करणार आहे. तसेच, आरमोरी येथील बीएसएनएल टॉवरजवळील त्याच्या मालकीच्या इलेक्ट्रिक साहित्याच्या गोदामात मोठ्या प्रमाणात देशी-विदेशी तसेच हातभट्टी मोहाची दारू साठवून ठेवण्यात आल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती.
या माहितीच्या आधारे आरमोरी पोलिसांनी सापळा रचून कारवाई केली. या प्रकरणी सुनिल जिभकाटे याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. कारवाईदरम्यान अवैध दारूसह चारचाकी वाहन असा एकूण १५ लाख ६५ हजार १८० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला होता.
पुढील तपास आणि पडताळणीदरम्यान अवैध दारूच्या साठवणुकीसाठी वापरण्यात आलेले संबंधित बांधकामही अनधिकृत असल्याचे उघड झाले. ही बाब गडचिरोली पोलीस दलाने आरमोरी नगरपरिषद प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिली. त्यानंतर पोलीस दल आणि आरमोरी नगरपरिषद यांच्या समन्वयातून नियमानुसार कारवाई करत संबंधित अनधिकृत इमारत जमीनदोस्त करण्यात आली.
ही कारवाई केवळ अवैध दारू विक्रीपुरती मर्यादित नसून बेकायदेशीर व्यवसायांना आश्रय देणाऱ्या अनधिकृत बांधकामांवरही कायद्यानुसार कठोर कारवाई करण्यात येईल, असा स्पष्ट इशारा या कारवाईतून देण्यात आला आहे.
पोलीस अधीक्षक एम. रमेश यांच्या आदेशान्वये अपर पोलीस अधीक्षक (अभियान) कार्तिक मधीरा, अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन) गोकुल राज जी. आणि सहायक पोलीस अधीक्षक अनिकेत हिरडे यांच्या नेतृत्वात गडचिरोली पोलीस दलाने आरमोरी नगरपरिषद प्रशासनाच्या सहकार्याने ही कारवाई पार पाडली.
“कायद्याचे उल्लंघन करणाऱ्यांची कोणतीही हयगय केली जाणार नाही. अवैध व्यवसायांविरोधात सातत्याने कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येईल,” असा इशारा पोलीस अधीक्षक एम. रमेश यांनी दिला आहे.













