The गडविश्व
गडचिरोली, दि. २८ : गडचिरोली जिल्ह्याच्या नक्षलविरोधी मोहिमेत सी-६० पथकाचे पार्टी कमांडर व पोलीस उपनिरीक्षक (पोउपनि.) वासुदेव राजम मडावी यांनी दाखवलेल्या अद्वितीय शौर्याची दखल घेत आज त्यांचा विशेष गौरव करण्यात आला. गेल्या २६ वर्षांच्या अखंड सेवाकाळात त्यांनी ५८ चकमकींमध्ये धाडसी नेतृत्व करीत तब्बल १०१ माओवाद्यांना कंठस्नान घातले असून ५ जहाल माओवादींना जिवंत अटकही केली आहे.
सन १९९८ मध्ये पोलीस शिपाई पदावरून गडचिरोली पोलीस दलात प्रवेश घेतलेल्या मडावी यांनी सातत्याने दाखवलेल्या शौर्यामुळे आणि निर्भय नेतृत्वगुणांमुळे तीन वेगवर्धित पदोन्नती मिळवत पोलीस उपनिरीक्षक पदापर्यंतचा प्रवास केला आहे. धोकादायक जंगल मोहिमा, अनिश्चित परिस्थिती आणि जीवावर उदार होऊन केलेल्या कारवायांमध्ये त्यांनी सी-६० पथकाचा विश्वासार्ह कमांडर म्हणून आपली ओळख निर्माण केली आहे.
त्यांच्या शौर्यपूर्ण कामगिरीबद्दल त्यांना मा. राष्ट्रपतींकडून पोलीस शौर्य पदक, “असाधारण आसूचना कुशलता पदक”, तसेच पोलीस महासंचालक सन्मानचिन्ह मिळाले आहे. आणखी दोन शौर्यपदकांसाठी त्यांची नावे प्रलंबित आहेत.
मडावी यांनी अनेक ऐतिहासिक चकमकींमध्ये महत्वपूर्ण भूमिका निभावली आहे. बोरीया-कसनासूर चकमकीत ४०, मर्दिनटोला येथे २७, गोविंदगावात ६, कोपर्शी-कोढूर येथे ५, कतरंगट्टा येथे ३ तर नुकत्याच झालेल्या कोपर्शी चकमकीत ४ माओवाद्यांना कंठस्नान घालून एकूण १०१ माओवादी संपवण्याचा पराक्रम त्यांच्या नावावर नोंदला गेला आहे.
आज गडचिरोली येथे आयोजित समारंभात जिल्हा पोलीस अधीक्षक श्री. नीलोत्पल यांच्या हस्ते व वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत पोउपनि. वासुदेव मडावी यांचा शाल-श्रीफळ देऊन गौरव करण्यात आला. त्यांच्या या यशस्वी लढाऊ कारकिर्दीमुळे गडचिरोली जिल्ह्याच्या सुरक्षेत मोलाची भर पडली असून पोलीस दलातील इतर जवानांसाठी ते प्रेरणास्थान ठरले आहेत.
#thegdv #thegadvishva #gadchirolinews #gadchirolipolice #गडचिरोली #Police #C60 #Maoist #Encounter #शौर्यगौरव #वासुदेवमडावी #Naxal #MaharashtraPolice #Security













