– रुग्णालयात सुरू आहे उपचार
The गडविश्व
गडचिरोली,दि.०५ : धानोरा तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र पेंढरी अंतर्गत रुपिनगट्टा या गावामध्ये सुमारे काल दुपारी २.३० वाजताच्या सुमारास बारश्याचे कार्यक्रमाकरिता सामुहिक भोजनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. दरम्यान या कार्यक्रमातील सुमारे ३० जणांना भोजनामुळे अन्न विषबाधा झाल्याचे आढळून आल्याची घटना घडली. सदर घटनेने खळबळ उडाली असून सर्वांवर रुग्णालयात उपचार सुरू आहे.
बारश्याच्या कार्यक्रमामध्ये सुमारे ७० लोक उपस्थित होते. भोजन कार्यक्रमात पहिल्या पंगतीमध्ये भोजनाकरीता बसलेल्या सुमारे ३० लोकांमध्ये उलटी, मळमळ अशी लक्षणे दिसुन आल्यानंतर जेवण थांबविण्यात आले. प्रथम प्रा. आ. केंद्र, पेंढरी येथे उपचार करुन पुढील उपचाराकरीता रुग्णवाहिकेने सायंकाळी ७.३० वा. च्या सुमारास ६ रुग्ण सामान्य रुग्णालय, गडचिरोली येथे करण्यात आले. भरती रुग्णांमध्ये उलटी, मळमळ, पोटदुखी व डोकेदुखी अशी लक्षणे आढळुन आली. त्यापैकी साहिल सत्तू पदा (वय ५ ) याची प्रकृती चिंताजनक असल्याने त्याला व्हेंटीलेटरवर घेवून उपचार सुरु करण्यात आले. व अन्य रुग्णांवर तातडीने उपचार सुरु करण्यात आले. त्यानंतर रात्री ११.०० वा. दरम्यान १४ रुग्ण रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले व सर्वावर उपचार सुरु करण्यात आले. सदर रुग्णांमध्ये १८ पुरुष व २ मूले यांचा समावेश आहे. २ मूलांपैकी एका मुलाला महिला व बाल रुग्णालय, गडचिरोली येथे सदर्भित करण्यात आले. सद्य:स्थितीत १ रुग्ण व्हेंटीलेटरवर असून इतर सर्व रुग्णाची परिस्थिती धोक्याबाहेर आहे. ६ रुग्ण हे छत्तीसगड राज्यातील पाखांजूर येथे उपचाराकरीता गेले असल्याचे रुग्णाकडून माहिती मिळाली. अन्न पदार्थाचे नमूने तपासणी करीता नागपूर येथे पाठविण्यात आलेले आहे. त्या अहवालानुसार नेमके कोणते विष मिश्रीत करण्यात आले याबाबत माहिती उपलब्ध होईल.
डॉ. प्रताप शिंदे, जिल्हा आरोग्य अधिकारी जि.प. गडचिरोली यांनी प्रा.आ. केंद्र पेंढरी येथे भेट देवून रुग्णांची विचारपूस केली व त्यांना वेळीच संदर्भ सेवा उपलब्ध करुन दिली. प्रा. आ. केंद्र पेंढरी येथे तालुका आरोग्य अधिकारी, धानोरा डॉ. अविनाश दहिवले, डॉ. सखाराम हिचामी, डॉ. रुपेश पेंदाम, साथरोग अधिकारी, जि.प. गडचिरोली , डॉ. पंकज हेमके, जिल्हा हिवताप अधिकारी, गडचिरोली हे उपस्थित होते.
रुग्णाच्या व्यवस्थापना करीता जिल्हा शल्य चिकित्सक, डॉ. प्रमोद खंडाते यांच्या मार्गदर्शनाखाली अति. जिल्हा शल्य चिकित्सक, डॉ. सतिशकुमार सोळंके, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. बागराज धूर्वे, भिषक डॉ. अशिष खुणे, श्वसन विकार तज्ञ डॉ. मनिष मेश्राम, डॉ.अनुपम महेशगौरी वरीष्ठ सल्लागार यांनी चमूद्वारे रुग्णसेवा पुरविण्याकरीता शर्थीचे प्रयत्न करुन रुग्णाचे प्राण वाचविले असे जिल्हा शल्य चिकित्सक, सामान्य रुग्णालय, गडचिरोली यांनी कळविले आहे.

(#thegdv #thegadvishva #gadchirolinews #gadchirolilocalnews #dhanora #pendhari)