– आरोपीमध्ये एका पत्रकार व एका पुरुष पोलीस अंमलदाराचा समावेश
The गडविश्व
गडचिरोली, दि.२९ : येथील शासकिय कार्यालयामध्ये कार्यरत अभियंता हा नागपुरात ‘हनी ट्रॅप’ मध्ये अडकला. आरोपींनी लाखो रुपयांची मागणी केली असता अभियंताने गडचिरोली पोलीस ठाण्यात २९ जानेवारी रोजी तक्रार दाखल केली. तक्रारीच्या अनुषंगाने स्थानिक गुन्हे शाखेचे एक पथक नागपूर येथे रवाना करून गुन्हा दाखल होऊन अवघ्या २४ तासाच्या आत नागपूर शहर गुन्हे शाखा पथकच्या मदतीने आरोपींना अटक केली आहे. सुशील गवई, रा. हिंगणा, नागपूर, रवीकांत कांबळे रा. नागपूर, रोहित अहिर रा. सुभाषनगर, नागपूर, ईशानी रा. नागपूर असे अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.
पोलिसांद्वारे मिळालेल्या माहितीनुसार, गडचिरोली येथील एका शासकिय कार्यालयामध्ये कार्यरत अभियंता ३ जानेवारी रोजी शासकिय कामाने नागपूर येथे गेला. दरम्यान आरोपी असलेला त्याचा जुना मित्र पोलीस कर्मचारी नागपूर सुशील गवई याने हिंगणा, नागपूर येथील हॉटेल मध्ये त्यांच्या मुक्कामाची व्यवस्था करुन दिली यावेळी अभियंतासह दोन महिला ज्या आरोपी आहेत त्या सुद्धा रुममध्ये थांबल्या. महिला आरोपीने अभियंतावर बलात्काराचा खोटा आरोप लावुन त्याच्याकडुन पैशाची मागणी केली. तसेच घटनाक्रमाचे दरम्यान आरोपी सुशील गवई याने आरोपी रवीकांत कांबळे (पत्रकार, रा. नागपूर) यास २८ हजार रुपये तसेच २ ते ३ लाख रुपये नगदी पेड केले असल्याचे भासविले. दरम्यान सर्व आरोपींनी गुन्हेगारी स्वरुपाचा कट कारस्थान रचुन अभियंतावर बलात्कार केल्याचा व त्यामुळे महिला आरोपी गरोदर राहीली असल्याचा खोटा आरोप लावुन बलात्काराचा गुन्हा दाखल करुन अभियंताची जनमानसात बदनामी करण्याची भिती घालुन हे प्रकरण मिटविण्यासाठी १० लाख रुपयांची मागणी करुन पैसे देण्यास जबरदस्ती केली. अशी तोंडी रिपोर्ट गडचिरोली पोलीस ठाण्यात दाखल केली असता अप क्र. 60/2024 कलम 384, 389, 120 (ब) भादवि अन्वये पोस्टे गडचिरोली येथे गुन्हा नोंद करण्यात आला.
सदर गुन्ह्राचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस अधीक्षक नीलोत्पल सा. यांनी स्थानिक गुन्हे शाखा येथील अधिकारी व कर्मचारी यांना सदर आरोपीतांचा शोध घेण्याबाबत निर्देशित केले. त्याअनुषंगाने स्थानिक गुन्हे शाखेचे एक पथक नागपूर येथे रवाना करण्यात आले असता, गुन्हा दाखल होऊन अवघ्या २४ तासाच्या आत स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने नागपूर शहर गुन्हे शाखा पथकच्या मदतीने गोपनिय सुत्रधारांकडुन खात्रीशिर माहिती घेऊन अतिशय शिताफीने आरोपींचा ठावठिकाणा शोधुन आरोपी सुशील गवई, रा. हिंगणा, नागपूर, रवीकांत कांबळे रा. नागपूर, रोहित अहिर रा. सुभाषनगर, नागपूर , ईशानी रा. नागपूर यांना ताब्यात घेऊन पुढील कायदेशिर कारवाईस्तव पोलीस स्टेशन गडचिरोली यांचे ताब्यात दिले. तसेच एक महिला आरोपी ही फरार असून तिचा शोध घेणे सुरु आहे. सर्व आरोपी यांना गडचिरोली पोलीसांनी आज संध्याकाळी अटक केली आहे. सदर गुन्ह्राचा तपास वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली पोस्टे गडचिरोलीचे प्रभारी अधिकारी पो.नि. अरुण फेगडे हे करत आहेत.
सदरची कारवाई पोलीस अधीक्षक नीलोत्पल सा., अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन) कुमार चिंता सा. व उपविभागीय पोलीस अधिकारी, गडचिरोली मयुर भुजबळ सा. यांचे मार्गदर्शनाखाली गडचिरोली पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी पोनि. अरुन फेगडे यांचे नेतृत्वात स्था.गु.शा. गडचिरोलीचे सपोनि. राहुल आव्हाड, पोहवा अकबर पोयाम, मपोहवा लक्ष्मी विश्वास, मपोअं वालदे, पोअं बोईनार, पोअं परचाके, पोअं प्रशांत गरुफडे, चापोहवा मनोहर तोगरवार चापोना/माणिक निसार, चापोअं दिपक लोणारे यांनी पार पाडली.