-विविध मुद्द्यांवर चर्चा
The गडविश्व
गडचिरोली, ११ ऑगस्ट : धानोरा येथे जागतिक आदिवासी दिनानिमित्त कार्यक्रम घेण्यात आला. या कार्यक्रमासाठी धानोरा तालुक्यातील संपूर्ण गावातील नागरिक उपस्थित होते. दरम्यान ११ विषयाचे ठराव घेण्यात आले. त्यामध्ये अवैध दारूविक्री बंदीचा ठराव मुक्तीपथ शहर संघटनेचे सदस्य ममता हीचामी यांनी मांडला. सोबतच या मुद्द्यावर चर्चा करण्यात आली.
यावेळी पेसा कायद्यानुसार गाव ग्रामससभेत मादक द्रव्य समिती असते, ती पुनर्गठित करणे हा ठराव मांडण्यात आला. तालुक्यातील ज्या गावात अवैध दारू विक्री केली जाते त्या गावांनी तत्काळ ग्रामसभा घेऊन दारू विक्री बंद करावी, तालुक्यातील ज्या गावांनी दारू विक्री बंद केलेली आहे आहे त्या गावांनी दारू विक्री मुक्त गाव (विजय स्तंभ) असे फलक लावावे असे ठराव सर्वानुमते मंजूर करण्यात आले. यावेळी सामाजिक नेते हिरामण वरखडे, आदिवासी समाजसेवक देवाजी तोफा, तालुक्यातील सर्व ग्रामसभा प्रतिनिधी, मुक्तीपथ तालुका टीम यांच्यासह बहुसंख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.