कोरची आश्रमशाळेत दहावी–बारावीच्या विद्यार्थ्यांचा भावनिक निरोप

57

कोरची आश्रमशाळेत दहावी–बारावीच्या विद्यार्थ्यांचा भावनिक निरोप
– अप्पर आयुक्त आयुषी सिंह यांची अचानक भेट, ‘बेस्ट स्टुडंट’ पुरस्कारांनी गौरव
The गडविश्व
ता. प्र / कोरची, दि. ०७ : शासकीय माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रमशाळा, कोरची येथे इयत्ता १० वी व १२ वीच्या विद्यार्थ्यांना शुभेच्छा देत निरोप देण्यासाठी भावनिक व प्रेरणादायी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाचे आयोजन इयत्ता ९ वी व ११ वीच्या विद्यार्थ्यांनी केले होते. शिक्षक, विद्यार्थी व पालकांच्या उपस्थितीत झालेल्या या कार्यक्रमात भावना, आपुलकी आणि प्रेरणेचा सुरेख संगम अनुभवायला मिळाला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक उमाकांत ढोक होते. प्रमुख अतिथी म्हणून शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष हिरालाल ऊईके यांच्यासह मनोज गजभिये, अरुण कायंदे व गुरुराज मेंढे उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात आदिवासी समाजाचे प्रेरणास्थान भगवान बिरसा मुंडा तसेच क्रांतीज्योती–ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आली.
दरम्यान, नागपूर आदिवासी विकास विभागाच्या अप्पर आयुक्त आयुषी सिंह (भा.प्र.से.), सहाय्यक आयुक्त दिगांबर चव्हाण व सहाय्यक शिक्षण विस्तार अधिकारी गिरीजा ऊईके यांनी अचानक शाळेला भेट दिली. त्यांच्या उपस्थितीमुळे कार्यक्रमाला विशेष महत्त्व प्राप्त झाले. मुख्याध्यापक उमाकांत ढोक यांनी मान्यवरांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.
यावेळी आयुक्त आयुषी सिंह यांच्या हस्ते अमित्रा कांटेगे, राकेश हिडामी, भूमिका मडावी, सोनाली कोरेट्टी, मिनाक्षी खोबा, तुषार गंगाकचूर, शुभांगी मडावी व श्रुती चंदनखेडे या विद्यार्थ्यांना ‘बेस्ट स्टुडंट’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. विद्यार्थ्यांनी जिद्द, चिकाटी व मेहनतीच्या जोरावर शैक्षणिक यश संपादन करून आदिवासी विकास विभागाचे नाव उज्ज्वल करावे, असे प्रेरणादायी आवाहन करत त्यांनी बोर्ड परीक्षांसाठी शुभेच्छा दिल्या.
निरोप समारंभात दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांनी शालेय जीवनातील आठवणी, शिक्षकांचे मार्गदर्शन व आश्रमशाळेतील अनुभव सांगताना भावनिक मनोगत व्यक्त केले. अनेक विद्यार्थ्यांचे डोळे पाणावले. भविष्यात समाजासाठी नवा आदर्श घडविण्याचा संकल्पही विद्यार्थ्यांनी व्यक्त केला.
कार्यक्रमास हरेश कामडी, अभिमन्यू वाटगुरे, प्रमोद शंभरकर, धनश्री परतेती, भैयालाल कुरसंगे, कुणाल गोवर्धन, सुमन अडभैया, कृष्णा गावडे, मनोज आचार्य, संतोष सहारे, अमित मेश्राम, गीता राऊत, सुषमा आंबोणे, चंद्रकला पटले, भारती साखरे, प्रिती खंडाते, नैना यंगलवार, भूमेश शेंडे, ओमप्रकाश रहिले, मयूर दोनाडकर, प्रथमेश पाटोळे आदी शिक्षक व कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संचिता हुपुंडी हिने केले तर आभार सावली कौशिक हिने मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी इयत्ता ९ वी व ११ वीच्या विद्यार्थ्यांनी विशेष परिश्रम घेतले. शेवटी सर्व विद्यार्थ्यांसाठी भोजनाची व्यवस्था करण्यात आली.
हा निरोप सोहळा विद्यार्थ्यांसाठी प्रेरणा, आत्मविश्वास व पुढील वाटचालीसाठी नवी ऊर्जा देणारा ठरला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here