– प्रवाशांना बसची प्रतिक्षा
The गडविश्व
ता.प्र / धानोरा, दि. २१ : कोरोना प्रादुर्भावामुळे धानोरा ते नागपूर ही बससेवा बंद करण्यात आली होती. मात्र आता चार वर्षे उलटून गेली पण पुर्ववत राज्य परिवहन महामंडळाची गडचिरोली आगाराची बस सुरू न झाल्याने प्रवाशांना कमालिचा त्रास सोसावा लागत असल्याने धानोरा ते नागपूर बस पुर्ववत सुरू करण्याची मागणी धानोरा तालुक्यातील जनतेनी केली आहे.
धानोरा तालुक्यातील लोकांना नागपुरला खरेदी, दवाखाना, कार्यालयीन, काँलेज, शिक्षण अशा विविध कामाकरिता धानोरा ते नागपूर बसने नियमित जात होते परंतु कोरोना काळात बंद पडलेल्या बस सुरू करण्यासाठी चार वर्षांत कोणत्याही हालचाली झालेल्या दिसत नाहीत.
धानोरा तालुक्यातील नागरीकांना विविध कामांसाठी व विद्यार्थ्यांना शाळेत जायला सकाळी लवकर उठून मुरुमगाव येथून येणाऱ्या बसची वाट बघत राहावे लागते. ती बस मिळाली नाही तर नऊ वाजताची बस गडचिरोली येथून आल्याशिवाय पर्याय नाही. चार वर्षा अगोदर धानोरा ते नागपूर- काटोल ही बससेवा नियमित सुरू होती. सकाळी ६.०० वाजता धानोरा येथुन बस धानोरा-गडचिरोली-नागपूर-काटोल अशी चालत होती. परंतु चार वर्षांपासून बंद झालेली बस पुन्हा सुरु करण्यात आली नाही. प्रवाशांना नाहक त्रास होत आहे. तरीही प्रवाशांच्या या समस्या कडे लोकप्रतिनिधीची डोळेझाक सुरू आहे. निवडणुका जवळ आल्या की आमदार खासदारांचे दर्शन होते पण धानोरा तालुक्यातील समस्या सोडविण्यासाठी कोणीही पुढाकार घेताना दिसत नाही. हिच धानोरा तालुक्यातील नागरीकांची शोकांतिका आहे.