धानोरा : दोन चारचाकींची समोरासमोर भीषण धडक, आश्रमशाळेचा विद्यार्थी ठार

270

धानोरा–मुरुमगाव मार्गावर दोन चारचाकींची समोरासमोर भीषण धडक, आश्रमशाळेचा विद्यार्थी ठार
– महिला जखमी
The गडविश्व
ता. प्र / धानोरा, दि. २५ : धानोरा–मुरुमगाव मार्गावरील जपतलाई गावाजवळ आज रविवार 25 जानेवारी 2026 रोजी दुपारी सुमारे 1.30 वाजता दोन चारचाकी वाहनांची समोरासमोर जोरदार धडक होऊन भीषण अपघात घडला. या दुर्घटनेत आश्रमशाळेतील 12 वर्षीय विद्यार्थी ठार झाला असून एक महिला गंभीर जखमी झाली आहे.
प्राप्त माहितीनुसार, गोंदिया जिल्ह्यातील अर्जुनी मोरगाव तालुक्यातील येरंडी येथील मालिनीताई दहिवडे अनुदानित आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांच्या पालकांना 26 जानेवारीच्या सांस्कृतिक कार्यक्रमासाठी घेऊन जाण्यासाठी स्कॉर्पिओ वाहन जपतलाई मार्गे गोडलवाहीकडे निघाले होते. त्याचवेळी धानोऱ्याकडून येणारी टाटा कार (क्रमांक CG 04 PG 7896) जपतलाईच्या नागमोडी वळणावर स्कॉर्पिओला समोरासमोर धडकली. धडकेनंतर स्कॉर्पिओ पलटी झाली, तर टाटा कार झाडावर आदळली.
या अपघातात आश्रमशाळेचा विद्यार्थी रोशन राजू किंरंगे (वय 12), रा. गोडलवाही, ता. धानोरा याचा जागीच मृत्यू झाला. टाटा कारमध्ये पती-पत्नी व मुलगा प्रवास करत होते. त्यापैकी निधी गुप्ता (वय 43), रा. मोहला, छत्तीसगड या महिला जखमी झाल्या असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
अपघाताची माहिती मिळताच पोलीस व मदत पथक घटनास्थळी दाखल झाले. अपघातामुळे काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती. घटनेचा पुढील तपास पोलीस करीत आहेत.
#thegdv #thegadvishva #gadchirolinews #gadchirolipolice #accident #dhanora

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here