देसाईगंज : रेती तस्करांना वैनगंगा नदी वरदान, खड्डे बुजवून पुन्हा रेती तस्करी जोमात

423

– राजकीय नेत्याचा आशीर्वाद ? निडर रेती तस्करांचा वाली कोण ?
The गडविश्व
गडचिरोली, दि.२९ : तालुक्यातून वाहणाऱ्या वैनगंगा नदी पात्रातुन अवैधरित्या होत असलेल्या रेती तस्करीवर महसूल विभागाने यापूर्वी कारवाई करत नदीघाट परिसरात खड्डे खोदले होते. मात्र निडर रेती तस्करांनी पुन्हा ते खड्डे बुजवत आता काळोख अंधारात रेती तस्करी करीत असल्याचे समजते. चक्क महसूल विभागाने खोदलेले खड्डे बुजवून रेती तस्करी केली जात असल्याने रेती तस्करांवर राजकीय नेत्याचा आशीर्वाद असल्याचे परिसरात बोलली जात आहे.
शासनाला गौणखनिज मोठ्या प्रमाणात महसूल मिळवून देतो. मात्र काही अधिकारी आणि राजकीय नेत्यांच्या आशीर्वादाने राजरोसपणे रेती तस्करी होत असल्याचे प्रकरण यापूर्वीही उघडकीस आले आहे. काही महिन्यांपूर्वी देसाईगंज तालुक्यातील कुरुड-कोंढाळा घटावरून होणाऱ्या अवैध रेती तस्करीवर महसूल विभागाने धाड टाकून कारवाई केली होती. तसेच महसूल विभागाने सदर परिसरात खड्डे खोदले होते मात्र ते म्हणतात ना “जित्याची खोड मेल्याशिवाय जात नाही” त्याचप्रमाणे या ठिकाणी रेती तस्करांनी काही दिवस तस्करी बंद ठेवत आता चक्क खड्डे बुजवून रेती तस्करी केली जात असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. त्यामुळे महसूल विभागाने केलेल्या कारवाई आणि मेहनतीवर “रेती वरून पाण्याची लाट जशी जाते” तसेच काही घडले असे म्हणायला हरकत नाही.
निडर रेती तस्करांची ही हिंमत बघता त्यावर राजकीय नेत्याचा आशीर्वाद असल्याचे बोलल्या जात असून तो राजकीय नेता हा रेती तस्करांचा “अंकल” म्हटले जात आहे. रेती तस्करही छाती ठोकून आपल्यावर कोणीही कारवाई करणार नाही असे सांगत असल्याने नेमका पाणी मुरतोय कुठे असा देखील सवाल उपस्थित होत आहे. तर या रेती तस्करांवर आशीर्वाद असलेला राजकीय नेता “अंकल” कोण ? महसूल विभाग या अवैध रेती तस्करांवर कारवाई करून त्या “अंकल” चा शोध घेणार काय ? तो राजकीय नेता आहे तरी कोण हा संशोधनाचा विषय असला तरी खुलेआम गौणखणीजाची होत चाललेली लयलूट थांबविणे आवश्यक आहे असे सुजाण नागरिकांकडून बोलल्या जात आहे. तो “अंकल” कोण ? याबाबत आता महसूल विभागाला शोध घेणे आव्हान उभे असून होणारी लूट थांबविणे सुद्धा गरजेचे झाले आहे. त्यामुळे महसूल विभाग आता काय कारवाई करते याकडे लक्ष लागले आहे.

(gadchiroli, gadchiroli news, desaiganj, kondhala kurud)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here