The गडविश्व
ता.प्र/ धानोरा, दि. १० : कै. महेश सावकार पोरेड्डीवार अध्यापक विद्यालय, धानोरा (जिल्हा गडचिरोली) मधील वर्ष २०१० ते २०१२ च्या सत्रातील विद्यार्थ्यांचा गेट-टुगेदर सोहळा ८ व ९ मार्च रोजी किसान भवन, धानोरा येथे मोठ्या उत्साहात पार पडला. तब्बल १३ वर्षांनंतर वर्गमित्र आणि मैत्रिणी एकत्र आल्याने हा सोहळा भावनिक आणि आनंददायी ठरला.
८ मार्च रोजी जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून या सोहळ्याची सुरुवात करण्यात आली. या कार्यक्रमाला विद्यार्थ्यांना शिक्षकी पेशाचे धडे देणारे शिलार, थोटे, बोरकर आदी अध्यापक वृंद उपस्थित होते. शिक्षकांचा शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ आणि भेटवस्तू देऊन सन्मान करण्यात आला. त्यानंतर, शिक्षक आणि विद्यार्थ्यांनी आपल्या आठवणींना उजाळा दिला.

वर्गमित्रांचा भावनिक पुनर्मिलन सोहळा
राज्यभरातून विविध ठिकाणी कार्यरत असलेले वर्गमित्र आपल्या परिवारासह या कार्यक्रमाला उपस्थित होते. या सोहळ्यात लहान मुलांसाठी विशेष भेटवस्तूंचे वाटप करण्यात आले. खेळ, नृत्य आणि मनोरंजनाच्या विविध कार्यक्रमांमधून सर्वांनी जुन्या आठवणींमध्ये रंगून गेल्याने कार्यक्रमाला विशेष रंगत आली.
“पुन्हा एकदा… एक दिवसाची शाळा, तेच मित्र, तीच मौज! जुन्या मस्तीत, नव्या ढंगात… चला, एकत्र रमत जाऊया!” या घोषणेने वातावरण भारावून गेले.
निरोपाच्या क्षणी भावूक वातावरण
दुसऱ्या दिवशी, कार्यक्रमाची सांगता होत असताना, सर्व शिक्षक, वर्गमित्र आणि मैत्रिणी भावूक झाले. अश्रूंना वाट मोकळी करत भिजलेल्या डोळ्यांनी सर्वांनी एकमेकांचा निरोप घेतला.
“पुन्हा भेटूया” या वचनाने सोहळ्याची सांगता झाली आणि हा गेट-टुगेदर आठवणीत राहील असा क्षण बनला.