गडचिरोली पोलिसांच्या कार्याचे मुख्यमंत्र्यांनी केले विशेष कौतुक

165

– चकमकीत १२ नक्षली ठार
The गडविश्व
गडचिरोली, दि.१८ : गडचिरोली पोलिसांनी चकमकीत १२ नक्षल्यांना ठार केल्याच्या या यशस्वी कारवाईबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विशेष कौतुक केले आहे.
छत्तीसगड सीमेजवळील गडचिरोली जिल्ह्यातील वांडोली गाव परिसरात बुधवार १७ जुलै रोजी पोलीस नक्षल चकमक उडाली. या चकमकीत १२ नक्षल्यांना ठार करण्यात गडचिरोली पोलिसांना यश आले आहे तर C60 चे एक पोलिस उपनिरीक्षक आणि एक जवान जखमी झाले त्यांना तात्काळ उपचारांसाठी नागपूरला हलवण्यात आले आहे. दोघेही धोक्याबाहेर असल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले. घटनास्थळावरून ३ AK47, २ INSAS, १ कार्बाइन आणि १ SLR या ७ स्वयंचलित शस्त्र जप्त करण्यात आले. तब्बल ६ तासांहून अधिक काळ अधूनमधून गोळीबार या चकमकीत चालू राहिला. मृत नक्षल्यांमध्ये एकाची ओळख टिपागड दलमचे प्रभारी DVCM लक्ष्मण आत्राम उर्फ विशाल आत्राम म्हणून पटली आहे.
दरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या यशस्वी कारवाईनंतर गडचिरोलीचे पोलिस अधीक्षक, पोलिस उपमहानिरीक्षक (गडचिरोली परिक्षेत्र), पोलिस महानिरीक्षक (नक्षल विरोधी अभियान) आणि इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांना व्यक्तिशः फोन करून त्यांचे हार्दिक अभिनंदन केले. त्यांनी सर्व सहभागी जवानांच्या शौर्याचे कौतुक करून त्यांना शुभेच्छा दिल्या. मुख्यमंत्र्यांनी या यशस्वी कारवाईचे महत्त्व अधोरेखित करताना म्हटले, “ही कारवाई गडचिरोली जिल्ह्यातील नक्षलवादी हालचालींवर निर्णायक आघात ठरेल. आमचे धोरण स्पष्ट आहे – विकासाला प्राधान्य देणे आणि हिंसाचाराला ठाम विरोध करणे. येत्या काळात गडचिरोली जिल्हा संपूर्णपणे नक्षलमुक्त करण्याचा आमचा निर्धार आहे.”
उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री यांनी या कारवाईत सहभागी असलेल्या जवानांना ५१ लाख रुपयांचे विशेष बक्षीस जाहीर केले आहे.

(#thegdv #thegadvishva #gadchirolipolice #gadchirolipolicenaxalancounter #breaking #eknathshinde)

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here