कौशल्य दिनानिमित्त धानोरा जिल्हा परिषद हायस्कूलमध्ये करिअर मार्गदर्शन
– विद्यार्थ्यांना स्वयंरोजगार, कौशल्य विकास व विविध करिअर संधींची माहिती
The गडविश्व
ता.प्र/ धानोरा, दि. १६ : जागतिक युवा कौशल्य दिनानिमित्त धानोरा येथील जिल्हा परिषद हायस्कूल तथा कनिष्ठ महाविद्यालयात विद्यार्थ्यांसाठी करिअर मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. व्यवसाय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना विविध करिअर संधी, कौशल्य विकास आणि स्वयंरोजगाराच्या संधींबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे मुख्याध्यापक सुरजुसे होते. प्रमुख मार्गदर्शक म्हणून डॉ. संस्कृती गेडाम यांनी विद्यार्थ्यांना व्यवसाय शिक्षणाचे महत्त्व, बदलत्या काळातील रोजगाराच्या संधी आणि कौशल्याधारित शिक्षणाची गरज याविषयी मार्गदर्शन केले.
यावेळी कृषी, आरोग्य, उद्योग तसेच विविध स्वयंरोजगार क्षेत्रांतील संधींची माहिती देण्यात आली. राज्य शासनाच्या कौशल्य विकास योजनांचीही विद्यार्थ्यांना माहिती करून देण्यात आली. योग्य कौशल्ये आत्मसात करून स्वावलंबी होण्याचे आवाहन डॉ. गेडाम यांनी केले.
कार्यक्रमाला शाळेतील सर्व शिक्षक व विद्यार्थ्यांची उपस्थिती होती. या मार्गदर्शनामुळे विद्यार्थ्यांना पुढील शिक्षण आणि करिअर निवडीसाठी उपयुक्त दिशा मिळाल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.













