सोनेरांगी-जांभळी नाल्यात ५० वर्षीय इसमाचा मृतदेह आढळला
– परिसरात खळबळ; कुरखेडा पोलिसांचा तपास सुरू
The गडविश्व
ता. प्र/ कुरखेडा, दि. २८ : कुरखेडा तालुक्यातील सोनेरांगी-जांभळी नाल्यात ५० वर्षीय इसमाचा कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली. सोमवार (२७ जुलै) दुपारी सुमारे २ वाजताच्या सुमारास ही घटना उघडकीस आली.
मृताची ओळख कालिदास वाघ (वय ५०, रा. साखरा-पळसगाव) अशी झाली आहे. त्यांचे सासर सोनेरांगी येथे असून, पावसाळ्यातील शेतीच्या कामानिमित्त ते कुटुंबासह काही दिवसांपासून तेथे वास्तव्यास होते.
मिळालेल्या माहितीनुसार, २४ जुलै रोजी कालिदास वाघ हे सोनेरांगी येथे आले होते. त्यानंतर “गावी जातो” असे सांगून ते सायंकाळी घरातून निघाले. त्यावेळी जांभळी नाल्याला मोठा पूर असल्याने ते परत न आल्यामुळे त्यांचा शोध सुरू होता.
दरम्यान, मंगळवारी नाल्यालगतून जाणाऱ्या नागरिकांना दुर्गंधी आल्याने त्यांनी पाहणी केली असता नाल्यात कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह आढळून आला. याबाबत जांभळीचे पोलीस पाटील यांनी कुरखेडा पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. मृताची ओळख कालिदास वाघ अशी पटली असून, मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला आहे.
या घटनेचा पुढील तपास कुरखेडा पोलीस करीत असून, मृत्यूचे नेमके कारण शवविच्छेदन अहवालानंतर स्पष्ट होणार आहे.
#thegdv #thegadvishva #gadchirolinews #gadchirolipolice













