काँग्रेसला मोठा झटका, राहुल गांधी यांची खासदारकी रद्द

685
संग्रहित छायाचित्र

– लोकसभा सचिवालयाने एक अधिसूचना जारी करत ठरवले अपात्र
The गडविश्व
नवी दिल्ली, २४ मार्च : काँग्रेस नेते राहुल गांधी यांची खासदारकी लोकसभा सचिवालयाने एक अधिसूचना जारी करत रद्द केल्याची माहिती समोर येत आहे. त्यामुळे काँग्रेसला हा मोठा झटका मानला जात आहे. दरम्यान, सूरत येथील कोर्टाने राहुल यांना गुरुवारी मानहानी प्रकरणी दोषी ठरवत त्यांना दोन वर्षांची शिक्षा ठोठवली होती. काँग्रेसचे नेते राहुल गांधी हे वायनाडचे खासदार होते. वायनाडचे खासदार २३ मार्च २०२३ पासून लोकसभेसाठी अपात्र ठरले आहेत असे लोकसभा सचिवालयाने एक अधिसूचना जारी केली त्यात म्हटले आहे. लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी राहुल गांधी यांच्यावर मोठी कारवाई केली आहे.
सूरत येथील कोर्टाने दोषी ठरवल्याच्या तारखेपासून लोकसभा सदस्य म्हणून अपात्र ठरवण्यात आले आहे. राहुल गांधी हे केरळमधील वायनाड येथील खासदार आहेत. त्यांना गुन्हेगारी मानहानीच्या प्रकरणात दोषी ठरविण्यात आल्याने त्यांना अपात्र ठरविण्यात आल्याचे लोकसभा सचिवालयाने जारी केलेल्या अधिसूचनेत म्हटले आहे. राहुल गांधी आज सकाळी लोकसभेत आले. त्यांना बोलू द्यावे, अशी मागणी करत काँग्रेस खासदारांनी सभागृहाच्या वेलमध्ये धाव घेतल्याने गोंधळ उडाला. काही वेळाने लोकसभेचे कामकाज तहकूब करण्यात आले. काँग्रेसने आज देशाच्या राजधानीत मोठ्या आंदोलनाची योजना आखली होती. त्याचवेळी आज सकाळी संसदेतील काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्या कार्यालयात विरोधकांची बैठक झाली होती. राहुल गांधी यांनी मोदी आडनावावरुन वादग्रस्त विधान केले होते. त्यांच्या या मानहानी गुन्ह्यात दोन वर्षांची शिक्षा सुनावली आहे.  २०१९ रोजी कर्नाटकातील एका सभेत केलेल्या वक्तव्यानंतर राहुल गांधी यांच्यावर सूरत येथे गुन्हा दाखल झाला होता. २०१९ मध्‍ये लोकसभा निवडणूक प्रचारासाठी कर्नाटकमधील कोलार येथे राहुल गांधी यांची सभा होती. यावेळी त्‍यांनी मोदी यांच्‍या नावावरुन वादग्रस्त विधान केले होते. देशातील सर्वच घोटाळ्यातील आरोपींचे नाव मोदी आहे, असे राहुल गांधी यांनी म्हटले होते. याप्रकरणी भाजपचे आमदार आणि गुजरातचे माजी मंत्री पूर्णेश मोदी यांनी राहुल गांधी यांच्यावर मानहानीचा खटला दाखल केला होता. राहुल यांच्या वक्तव्याने संपूर्ण मोदी समाजाच्या प्रतिष्ठेला धक्का लागल्याचा आरोप मंत्री पूर्णेश मोदी यांनी केला होता.

(The gadvishva) (the gdv) (rahul gandhi) (modi)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here