छत्रपतींचे नाव घेवून सत्ता मिळवू पाहणाऱ्यांपासून सावध राहा

457

– शेकाप नेते भाई रामदास जराते यांचे आवाहन
The गडविश्व
गडचिरोली, दि. १९ : छत्रपती शिवाजी महाराजांनी बारा बलुतेदार आणि अठरापगड जातींच्या लोकांना घेऊन स्वराज्य स्थापन केले होते. मात्र आज जाती धर्माच्या नावाने समाजात तेढ निर्माण करणारे छत्रपतींचे नाव घेवून पुन्हा सत्ता मिळवू पाहत असून शिवप्रेमी जनतेने येणाऱ्या काळात सावध राहावे, असे आवाहन शेतकरी कामगार पक्षाचे नेते भाई रामदास जराते यांनी केले.
तालुक्यातील राजोली येथील स्वराज्य युवा मंडळाने आयोजित केलेल्या शिवजयंती सोहळ्यात ते अध्यक्षस्थानावरून बोलत होते. भाई रामदास जराते पुढे म्हणाले की, रामराज्यांचे स्वप्न दाखवणाऱ्यांनी देशातील कष्टकरी, कामगार, शेतकरी, शेतमजूर, नोकरदार आणि युवक बेरोजगारांना उध्वस्त करणारे धोरणं लादण्याचे काम केले आहे. एवढेच नाही तर देशात धार्मिक उन्माद पसरविण्याचे काम भारतीय जनता पक्षाने चालविले असल्याची टीकाही त्यांनी केली.
कार्यक्रमाचे दिपप्रज्वलन भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष प्रणय खुणे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पक्षाचे जिल्हा प्रभारी राज बन्सोड, सामाजिक कार्यकर्ते विनोद मडावी, प्रतिक डांगे, सतिश दुर्गमवार, राजोली च्या सरपंच कांता हलामी, उपसरपंच पंकज कन्नाके, जमगावचे सरपंच देवीदास मडावी, तंटामुक्त समितीचे संजय तुंकलवार, तलाठी वासनिक, ऊसेंडी, नागवेलीचे शिक्षक दुर्गे, वनरक्षक गोडवे प्रामुख्याने उपस्थित होते.
कार्यक्रमा दरम्यान पोटेगाव पोलिस मदत केंद्राचे प्रभारी अधिकारी कांबळे यांनी भेट देवून आयोजकांचे कौतुक केले.प्रास्ताविक विलास दामले यांनी तर संचालन किर्ती बावणे यांनी केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here