– शेतकरी झाले हतबल
The गडविश्व
ता. प्र / आरमोरी (नरेश ढोरे), १७ सप्टेंबर : अवकाळी पुर, वाघाची भीती, हत्तींची नासधूस, गोसेखुर्द धरणातील पाण्याच्या अतिशय विसर्गाने वैनगंगा नदी व तिला जोडणाऱ्या उपनद्यांना पुराचा जोरदार फटका बसलेला आहे. यामध्ये प्रामुख्याने गाढवी नदी व खोब्रागडी नदी सलग दुसऱ्या दिवशीही फुगून आहेत. या नद्यांच्या काठावरील आरमोरी परिसरातील शेतकऱ्यांचे धानपीक पूर्णपणे पाण्याखाली गेल्याचे चित्र दिसत आहे. अगदी एक महिन्यात धानपिक घरी येण्याच्या वेळेवर अवकाळी पुराने तोंडचा घास हिरावला, याचा सर्वात जास्त फटका आरमोरी परिसरातील रामपूर, पालोरा, शिवनी, सायगाव, वघाडा, डोंगरगाव, ठाणेगाव, वासाळा व देऊळगाव या गावांना बसला असून शंकर नगर पाथरगोटा,पळसगाव, या गावातील शेतीची जंगली हत्तींनी नासधूस केलेली दिसत आहे.
गेल्या कित्येक दिवसापासून आरमोरी तालुक्यात जंगली हत्तींनी बस्थान मांडले आहे. नैसर्गिक संकटांना सामना करतांना शेतकरी हताश झालेले दिसत आहेत. करायला गेले तर खायला मिळत नाही, नाही केले तर पोट भरत नाही ! अशी अवस्था परिसरातील शेतकऱ्यांची झाली आहे. आता फक्त प्रतीक्षा ती पंचनामा करून नुकसान भरपाईची ! सरकार मायबाप, जे देईल त्यावर समाधान मानून गप्प बसण्याची वेळ शेतकऱ्यावर आलेली आहे. याकडे शासनाने तातडीने लक्ष देऊन लवकरात लवकर नुकसान भरपाई देण्यात यावी अशी शेतकऱ्यांकडून मागणी ही जोर धरत आहे.