विधिमंडळानंतर आता संसदेत घुमणार गडचिरोलीच्या जमीन अधिग्रहणाचा मुद्दा
– शेतकरी संघर्ष कृती समितीचा दिल्ली दौरा ; राष्ट्रपती, केंद्रीय मंत्री आणि विरोधी पक्षनेत्यांची घेणार भेट
The गडविश्व
गडचिरोली, दि.१७ : गडचिरोली जिल्ह्यात प्रस्तावित विमानतळ, एमआयडीसी आणि अन्य विकास प्रकल्पांसाठी सुपीक शेतजमिनी अधिग्रहित करण्याच्या प्रक्रियेविरोधात सुरू असलेला शेतकऱ्यांचा संघर्ष आता राष्ट्रीय स्तरावर पोहोचणार आहे. राज्य विधिमंडळात हा मुद्दा मांडल्यानंतर आता संसदेतही तो घुमविण्याचा निर्धार शेतकरी संघर्ष कृती समितीने केला आहे.
जिल्ह्यातील हजारो एकर सुपीक शेती अधिग्रहित झाल्यास मोठ्या संख्येने शेतकरी भूमिहीन होतील आणि त्यांच्या उपजीविकेवर गंभीर परिणाम होईल, अशी भीती शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे. विकास प्रकल्पांना विरोध नसून ते पर्यायी जागांवर उभारावेत, अशी भूमिका समितीने घेतली आहे.
या मागणीसाठी शेतकऱ्यांनी यापूर्वी निवेदने, मोर्चे आणि आंदोलने करून प्रशासनाचे लक्ष वेधले आहे. नुकतेच शेतकरी शिष्टमंडळाने मुंबईत राज्यपालांसह विविध आमदारांची भेट घेऊन जमीन अधिग्रहणाचा निर्णय मागे घेण्याची मागणी केली होती.
आता पुढील टप्प्यात शेतकरी शिष्टमंडळ दिल्लीला जाऊन राष्ट्रपती, केंद्रीय मंत्री, लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी, राज्यसभेतील विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे तसेच विविध पक्षांच्या खासदारांची भेट घेणार आहे. या भेटीदरम्यान गडचिरोलीतील जमीन अधिग्रहणाचा प्रश्न संसदेत उपस्थित करण्याची मागणी करण्यात येणार असल्याची माहिती समितीने दिली.
या पार्श्वभूमीवर महेंद्र ब्राह्मणवाडे यांच्या प्रमुख उपस्थितीत शेतकरी संघर्ष कृती समितीची बैठक पार पडली. बैठकीत दिल्ली दौऱ्याचा आराखडा, लोकप्रतिनिधींच्या भेटी तसेच आगामी आंदोलनाची दिशा यावर सविस्तर चर्चा करण्यात आली.
बैठकीस महेंद्र ब्राह्मणवाडे यांच्यासह दिवाकर निसार, प्रमोद भगत, अनिल कोठारे, मिलिंद खोब्रागडे, प्रशांत कोराम, ढिवरू मेश्राम, यादव गोमस्कर, मारुती कांबळे, स्वप्नील निकुरे, उत्तम ठाकरे यांच्यासह जिल्ह्यातील विविध गावांतील मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते.
शेतकरी संघर्ष कृती समितीने स्पष्ट केले की, विकास आणि शेती यामध्ये समतोल राखत सुपीक शेतजमिनींचे संरक्षण करणे आवश्यक आहे. पर्यायी जागांवर विकास प्रकल्प राबविण्याची मागणी मान्य होईपर्यंत आंदोलन सुरूच राहील, असा निर्धार बैठकीत व्यक्त करण्यात आला.
#thegdv #thegadvishva #gadchirolinews #gadchirolipolice













