मुलांच्या भूमिकेतून बालनाट्य लिहिणारे लेखक तयार होणे आवश्यक : अभिनेता सुबोध भावे

174

– बेळगांव येथील ‘पहिल्या बालनाट्य संमेलना’ची लोकप्रिय अभिनेते सुबोध भावे यांच्या उपस्थितीत सांगता
The गडविश्व
बेळगांव, २० फेब्रुवारी : बेळगांवमध्ये प्रसिद्ध अश्या अनघोळ येथे मुंबईच्या ‘बालरंगभूमी अभियान’द्वारे ‘पहिल्या बेळगांव बालनाट्य संमेलना’चा प्रसिद्ध अभिनेते सुबोध भावे यांच्या उपस्थितीत सांगता समारंभ रविवारी संपन्न झाला. याप्रसंगी बोलतांना ते म्हणाले, “मला वडिलांनी सहावीत असताना बालनाट्याच्या कार्यशाळेत घातलं. यामुळे माझा बालनाट्याशी संबंध आला. आपल्याकडे बालनाट्याची फार सुंदर परंपरा आहे. गेल्या काही दिवसात माझ्या लक्षात आले की, बालनाट्याची परंपरा संपली आहे. लहान मुलांसाठी आपल्याकडे चित्रपट नाही, मालिका नाही, काही नाही आहे. आपण मुलांसाठी काही करत नाही. समाज म्हणून आपण मुलांसाठी काही करत नाही. ही फार गंभीरपणे विचार करण्याची गोष्ट आहे. पुण्यात मुलांना खेळायचे असेल, तर दुर्दैवाने मैदान नाही. इथूनच मुलांना दुर्लक्षित करण्याची सुरुवात होते. उत्तम बाग नाही, जिथे मुले खेळू शकतात. मुलांनी खेळायचे नाही, असे आपण ठरवले आहे. कोरोनाच्या काळात आपण मुलांना मोबाईलमध्ये शिक्षणासाठी घातले. आता ते त्यातून बाहेर पडणे फार अवघड गोष्ट झाली आहे. मी लहानपणी जी बाल नाटके पाहिली, त्याची छबी आजही मनावर ताजी आहे. आपल्याकडे बालनाट्य लिहिणारे लेखक तयार होणे फार आवश्यक आहेत. जे मुलांच्या भूमिकेतून नाटकाकडे बघतील. आपल्याकडे जो शहाणपणा शिकवण्याचा अट्टाहास आहे, तो नाटकातून बाजूला व्हायला हवा. घरी आई – बाबा शहाणपणा शिकवतात, शाळेत शिक्षक शहाणपणा शिकवतात, परत आता नाटकातही शहाणपणा शिकवायचा आहे. मुलांना एक सकस मनोरंजन पाहिजे. नाटकाने मुलांना आनंद दिला पाहिजे. नाटकाने मुलांची करमणूक केली पाहिजे, हे जेव्हा त्यांना कळेल, तेव्हा मुले नाटकाकडे येतील”.
बेळगांवच्या अनघोळ येथील ‘संत मीरा हायस्कूल’मध्ये सकाळच्या प्रहरात आयोजित करण्यात आलेल्या चार कार्यशाळांमधे मुंबई, बेळगांव, कोकणातील मान्यवर नाट्य कलावंतांनी विध्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. या कार्यशाळांमध्ये बेळगांवमधील २५ विविध विद्यालयांतील ३०० हून अधिक विद्यार्थी, विद्यार्थिनी सहभागी झाले होते. ६०- ६० विद्यार्थ्यांचे गटात घेण्यात आलेल्या कार्यशाळेत दिलेल्या विषयांवर विद्यार्थ्यांनी विविध नाटके सादर केली. गेली दोन दिवस बेळगावातील अनेक विद्यार्थ्यांना नाट्यसंमेलनात प्रशिक्षणसोबतच विविध बालनाट्य पहाण्यासाठी मशगूल होते, यासोबतच त्यांनी अभिनेते सुबोध भावे, अभिनेत्री सई लोकूर, अभिनेते प्रसाद पंडित, संमेलन अध्यक्षा मीनाताई नाईक, ‘बालरंगभूमी अभियान,मुंबई’, ‘फुलोरा नाट्य संस्थे’च्या अध्यक्षा वीणाताई लोकूर, ‘अखिल भारतीय नाट्य परिषद’, बेळगांव अध्यक्षा संध्याताई देशपांडे, डॉ.राजेंद्र चव्हाण, देवदत्त पाठक आदी उपस्थित मान्यवरांसोबत चर्चा करून मनसोक्त आनंद लुटला.
पहिल्या गटातील कार्यशाळेत देवदत्त पाठक आणि मिलिंद केळकर यांनी मुद्राअभिनय, संघर्ष, कथानकाचं बीज, कथानक, कथानक आणि उपकथानकाची जोडणी, खलप्रवृत्ती अशी विविध कौशल्ये घेतली. ती कौशल्ये देहबोली, संवाद, विसंगती, अभिनयाने विद्यार्थ्यांनी उत्साहात केली. सभोवतालची माणसे, आजूबाजूला घडणाऱ्या घटना, चांगल्या गोष्टी कृतीत आणणे, आदी स्वत:च्या अभिनय कौशल्यासाठी उपयोग करावा, हे ही कार्यशाळेत सांगण्यात आलं. यातील मुलांशी पत्रकार शीतल करदेकर, प्रफुल्ल फडके आणि संतोष खामगावकर यांनी संवाद साधला.

दुसऱ्या गटाचे संचलन राजेंद्र चव्हाण यांनी केले, तर जितेंद्र रेडकर, ओम कृष्णजी यांनी त्यांना मदत केली.राजेंद्र चव्हाण यांनी विद्यार्थ्यांकडून विविध नाटकांचे सादरीकरण करून घेतले. या मुलांशी पत्रकार कपिल प्रभू, अतुल कुलकर्णी, नितीन फणसे आणि राम कोंडीलकर यांनी संवाद साधला. नाटकात काय करणे अपेक्षित आहे हे शिक्षकांनी आज शिकवल्याचे मुलांनी सांगितले. खेळातून कॉन्सन्ट्रेशन करायला शिकल्याचा आनंद मुलांच्या चेहऱ्यावरून ओसंडून वाहात होता.

गट क्रमांक तीनमधील मुलांचा वर्ग भरत मोरे आणि मयुरी मोहिते घेत होते.. त्यांना समीना सावंत आणि प्रसाद सावंत यांनी मदत केली. यातील मुलांशी पत्रकार विनीत मासावकर, युवराज अवसरमल, योगेश घाग, अभिजित जाधव यांनी संवाद साधला. गट क्रमांक चारचे नेतृत्व नयना डोळस, भरत मोरे, मयुरी मोहिते, लीला हडप यांनी केले, तर नीता कुलकर्णी, अर्चना ताम्हनकर यांनी त्यांना मदत केली.

चौथ्या गटात शिक्षक आणि पालकांची वेगळी कार्यशाळा ‘नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा’मधून अभ्यासक्रम पूर्ण केलेल्या संध्या रायते घेतली. शिक्षक आणि पालकांच्या कार्यशाळेत पालक शिक्षक संवाद – वाचक अभिनय, भूमिकेचे बाह्यरूप निरीक्षण आदींबाबत मार्गदर्शन केले. त्यांना मदतनीस म्हणून श्रीकांत आदोके यांनी कार्य सांभाळले. यात सहभागी झालेल्या शिक्षक व पालकांशी ज्येष्ठ पत्रकार रवींद्र पाथरे, नरेंद्र कोठेकर आणि सौमित्र पोटे यांनी संवाद साधला. या चार गटातील विधार्थी, पालक, शिक्षक यांच्याशी चर्चा करून पत्रकारांनी आढावा घेतला.

दुपारच्या सत्रात ‘शिरगांव हायस्कुल’, शिरगांव यांच्या विद्यार्थ्यांनी ‘धरतरी’, तसेच ‘नाट्यसंस्कार कला अकादमी’, पुणे यांनी ‘जीर्णोद्धार’, तर ‘रंगभूमी अभियान’, तळेगांव यांनी ‘माझी माय’ ही बालनाट्ये सादर करण्यात आली. यावेळी लोकप्रिय अभिनेते सुबोध भावे, बेळगांव येथील प्रख्यात अभिनेते प्रसाद पंडित, अभिनेत्री सई लोकूर, संमेलन अध्यक्षा मीना नाईक, वीणा लोकूर इत्यादी मान्यवर उपस्थित होते.

बालनाट्य सुरु होण्यापूर्वी जेष्ठ संपादक प्रफुल्ल फडके आणि पत्रकार शीतल करदेकर यांनी संमेलनाच्या अध्यक्षा मीना नाईक यांची प्रकट मुलाखत घेतली, तर अभिनेत्री सई लोकूर आणि वीणा लोकूर यांची प्रकट मुलाखत पत्रकार विनीत मासावकर आणि कपील प्रभु यांनी घेत त्यांचा बाल नाट्य रंगभूमीवरील प्रवास उलगडून दाखविला.

मुंबईच्या ‘बालरंगभूमी अभियान’ संस्थेतर्फे ‘पहिल्या बेळगांव बालनाट्य संमेलनाचे’ आयोजित करण्यात आलेल्या बालनाट्य संमेलनास ‘अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद शाखा बेळगाव’ आणि ‘फुलोरा बेळगाव’ या संस्थांचे सहकार्य लाभले.
संमेलनाध्यक्ष मीना नाईक, उद्धघाटक सई लोकूर, स्वागताध्यक्ष संध्या देशपांडे, बालरंगभूमी अभियान अध्यक्ष वीणा लोकूर, अभियानाचे उपाध्यक्ष राजेंद्र चव्हाण, सचिव देवदत्त पाठक, पत्रकार, शिक्षक, विद्यार्थी आदी मान्यवर उपस्थित होते.

(The Gadvishva ) (Gadchiroli News Updates) (Muktipath) (Shivratri images) (Cheteshwar Pujara) (Kartik Aaryan Shehzada) (Somvati Amavasya 2023) (Goa) (The Last of Us episode 6) vs Toulouse) (Man United vs Leeds United) (The Gdv) (

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here