अबब…गडचिरोलीत मग्रारोहयो अंतर्गत करोडोंची बोगस कामे, दोषी ग्रामसेकांवर निलंबनाची कारवाई

1622

– आणखी ६ ग्रामसेवक व शाखा अभियंता यांचेवर विभागीय चौकशी सुरु
The गडविश्व
गडचिरोली, २७ एप्रिल : महात्मा गांधी राष्ट्रिय ग्रामीण रोजगार हमी योजने अंतर्गत गडचिरोली जिल्हयातील भामरागड, अहेरी व मुलचेरा या तालुक्यातील करोडो रुपयाची बोगस कामे तसेच काम न करता पैशाची उचल करणाऱ्या ग्रामसेवकांवर जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी कुमार आशीर्वाद यांनी निलंबनाची कारवाई केली आहे. सदर कारवाईने जि.प. विभागात एकचं खळबळ उडाली आहे. निलंबित करण्यात आलेल्यांमध्ये विशाल एस चिडे, ग्रा.से. ग्रा. पं. मन्नेराजाराम पं.स भामरागड, सुनील की, जटीवार, ग्रा से. ग्रा.पं.बोटनफुंडी, पंस. भामरागड, लोमेश यादवराव सिडाम, ग्रा.से, ग्रा.पं. उमानुर पं. स. अहेरी यांचा समावेश आहे.
महात्मा गांधी राष्ट्रिय ग्रामीण रोजगार हमी योजने अंतर्गत गडचिरोली जिल्हयातील भामरागड, अहेरी व मुलचेरा या तालुक्यातील करोडो रुपयाची बोगस कामे तसेच काम न करता पैशाची उचल करणाऱ्या अधिकाऱ्यावर निलंबनाची कार्यवाही करण्याबाबतचे तक्रार पत्र निवासी उपजिल्हाधिकारी, जिल्हाधिकारी कार्यालय, गडचिरोली यांचे पत्र ०८ डिसेंबर २०२२ अन्वये प्राप्त झाले होते. त्याअनुषंगाने या कार्यालयाचे २२ डिसेंबर २०२२ चे आदेशान्वये जि.प. गडचिरोली चे उप मुख्य कार्यकारी अधिकारी रविंद्र एस. कणसे (ग्रा.पं.) यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती गठीत करण्यात आली होती. सदर समितीने २४ फेब्रुवारी २०२३ अन्वये चौकशी अहवाल सादर केलेला होता. प्राप्त चौकशी अहवालामध्ये भामरागड येथील गट विकास अधिकारी, शाखा अभियंता, सहाय्यक लेखा अधिकारी, विस्तार अधिकारी (पंचायत), व ६ ग्रामसेवक इत्यादी प्रथम दर्शनी दोषी आढळुन आल्याने दोन ग्रामसेवकांना तात्काळ निलंबित करण्यात आले असुन ६ ग्रामसेवक व शाखा अभियंता यांचेवर विभागीय चौकशी सुरु करण्यात आलेली आहे. तसेच गट विकास अधिकारी यांचेविरुध्द शिस्तभंग विषयक कार्यवाही करण्याकरीता विभागीय चौकशी प्रस्ताव शासनाकडे जोडपत्र १ ते ४ मध्ये सादर करण्यात आल्याचे कळते. तांत्रीक सहाय्यक (TPO) यांना काढुन टाकण्याबाबतची कार्यवाही सुरु करण्यात आलेली आहे तसेच अहेरी येथील एक ग्रामसेवक प्रथमदर्शनी दोषी आढळल्याने त्यांना निलंबित करण्यात आले आहे. तर यापुढे पंचायत समिती मुलचेरा व अहेरी मधील तक्रारी संबंधाने तांत्रीक बाबीच्या अनुषंगाने कार्यकारी अभियंता (बांधकाम) यांचेकडुन पुरक चौकशी करण्यात येणार असून या चौकशीमध्ये जे दोषी आढळतील त्यांचेवर कार्यवाही करण्यात येईल असेही मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी सांगितले आहे.

(the gdv) (the gadvishva) (gadchiroli zp) (gramsevak)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here