धानोरा : प्रतिबंधित तंबाखूची वाहतूक करणारे दोघे अटकेत, ९ लाखांचा मुद्देमाल जप्त

33

धानोरा : प्रतिबंधित तंबाखूची वाहतूक करणारे दोघे अटकेत, ९ लाखांचा मुद्देमाल जप्त
– फोर्ड इकोस्पोर्ट कारसह विविध प्रकारचा तंबाखू पोलिसांच्या ताब्यात
The गडविश्व
ता. प्र/धानोरा, दि. २७ : शासनाने प्रतिबंधित केलेल्या सुगंधित तंबाखूजन्य पदार्थांची अवैध वाहतूक करणाऱ्या दोघांविरुद्ध धानोरा पोलिसांनी कारवाई केली. धानोरा-चव्हेला मार्गावर केलेल्या वाहन तपासणीत विविध प्रकारचा प्रतिबंधित तंबाखू, हुक्का शिशा तंबाखू, मोबाईल आणि वाहतुकीसाठी वापरण्यात आलेली फोर्ड इकोस्पोर्ट कार असा एकूण ९ लाख ६ हजार ६७५ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
२४ नोव्हेंबर रोजी दुपारी ४ ते ५ वाजताच्या सुमारास प्रतिबंधित सुगंधित तंबाखू विक्रीसाठी नेली जात असल्याची गोपनीय माहिती धानोरा पोलिसांना मिळाली. या माहितीच्या आधारे पोलिसांनी धानोरा-चव्हेला मार्गावर संशयित वाहन थांबवून पंचांसमक्ष तपासणी केली. यावेळी वाहनात मोठ्या प्रमाणात प्रतिबंधित तंबाखूजन्य पदार्थ आढळून आले.
पोलिसांनी केलेल्या कारवाईत होला हुक्का शिशा तंबाखूची एक किलो वजनाची १९ पाकिटे (२५ हजार १७५ रुपये), ईगल हुक्का शिशा तंबाखूची ४०० ग्रॅम वजनाची २१ पाकिटे (१७ हजार ८५० रुपये), एक किलो वजनाची ईगल तंबाखूची सहा पाकिटे (१२ हजार ४५० रुपये) आणि मजा १०८ तंबाखूचे २०० ग्रॅम वजनाचे ४० टिन डबे (४५ हजार २०० रुपये) जप्त करण्यात आले.
याशिवाय तंबाखूच्या वाहतुकीसाठी वापरण्यात आलेली आठ लाख रुपये किमतीची पांढऱ्या रंगाची फोर्ड इकोस्पोर्ट कार (एमएच ३३ व्ही ६०२४) आणि सहा हजार रुपये किमतीचा रिअलमी नार्झो १० मोबाईलही जप्त करण्यात आला.
या प्रकरणी मुखरू मारखंडी बोरकुटे (वय ५८) आणि अंकुश विलास ठाकरे (वय २४, दोघेही रा. मौशीखांब, ता. जि. गडचिरोली) यांच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता २०२३ मधील कलम १२३, २२३, २७४, २०३(५) तसेच अन्न सुरक्षा व मानके कायदा २००६ मधील संबंधित कलमान्वये धानोरा पोलीस ठाण्यात २५ नोव्हेंबर रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या करवाईने परिसरातील अवैध तंबाखू व्यापाराचे प्रकरण पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. सदर कारवाई पोलीस निरीक्षक कैलास गवते यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. पुढील तपास परिविक्षाधीन पोलीस उपनिरीक्षक अजय कोरडे करीत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here