जंगलातील माओवाद्यांचा डम्प उघड; जमिनीत लपवलेली ३९.७७ लाखांची रोकड जप्त

15

जंगलातील माओवाद्यांचा डम्प उघड; जमिनीत लपवलेली ३९.७७ लाखांची रोकड जप्त
– सुरक्षा दलाची कारवाई; यापूर्वी ७.६० कोटींहून अधिक रोकड आणि ८.५ किलो सोने हस्तगत
The गडविश्व
बिजापूर, दि. २७ : छत्तीसगडमधील बिजापूर जिल्ह्यात सुरक्षा दलाने माओवाद्यांच्या आर्थिक साठ्यावर कारवाई करत जमिनीखाली लपवून ठेवलेली ३९ लाख ७७ हजार रुपयांची रोकड जप्त केली. भैरमगड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बडेपल्ली गावाजवळील जंगलात ही रोकड आढळून आली. विशेष म्हणजे, जिल्ह्यात यापूर्वीच्या विविध कारवायांमध्ये माओवादी डम्पमधून ७ कोटी ६० लाखांहून अधिक रोख रक्कम आणि ८.५ किलो सोने जप्त करण्यात आले आहे.
२४ नोव्हेंबर रोजी बडेपल्ली जंगल परिसरात जमिनीखाली संशयास्पद साहित्य लपवून ठेवल्याची माहिती मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलीस अधीक्षक उमेश प्रसाद गुप्ता यांच्या निर्देशानुसार डीआरजी, भैरमगड पोलीस आणि बीडीएस पथकाने संयुक्तपणे शोधमोहीम राबविली.
या मोहिमेदरम्यान बीडीएस पथकाकडून परिसराची तपासणी सुरू असताना जमिनीखाली एका पोत्यात लपवून ठेवलेला स्टीलचा डबा आढळला. डब्यात टेपने गुंडाळलेली पाकिटे होती. ती उघडून तपासणी केली असता त्यामध्ये ५०० रुपयांच्या नोटांच्या स्वरूपात एकूण ३९ लाख ७७ हजार रुपयांची रोकड आढळून आली.
दरम्यान, बिजापूर जिल्ह्यात माओवादी डम्पविरोधात यापूर्वी करण्यात आलेल्या विविध कारवायांमध्ये ७ कोटी ६० लाख ३३ हजार ८०० रुपये रोख आणि ८.५ किलोग्रॅम सोने जप्त करण्यात आले आहे. आता नव्याने सापडलेल्या रोकडीचीही त्यात भर पडली आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात रोकड आणि सोने कोठून जमा करण्यात आले, तसेच त्याचा वापर कोणत्या कारणासाठी होणार होता, याचा तपास पोलीस करीत आहेत.
#thegdv #thegadvishva #gadchirolinews #gadchirolipolice #cgnews #bujapur

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here