गडचिरोलीत २९ नोव्हेंबरला बहुजन विचारांचा जागर; ‘जनता अवेक इंडिया’ संमेलनाचे आयोजन
– राज्यभरातील विचारवंत, कार्यकर्ते आणि युवकांचा सहभाग; फुले-शाहू-आंबेडकरांच्या विचारांवर होणार मंथन
The गडविश्व
गडचिरोली, दि.२५ : आदिवासी, अनुसूचित जाती, ओबीसी, अल्पसंख्याक आणि वंचित समाजाच्या संवैधानिक हक्कांसह विविध सामाजिक प्रश्नांवर व्यापक विचारमंथन करण्यासाठी गडचिरोलीत प्रथमच राज्यस्तरीय ‘जनता अवेक इंडिया’ संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. लोकसंप-सोशल एज्युकेशन मुव्हमेंट (महाराष्ट्र राज्य) यांच्या वतीने रविवार, २९ नोव्हेंबर रोजी पोटेगाव मार्गावरील यमुना लॉन येथे हे संमेलन होणार आहे. मुंबईपासून भामरागडपर्यंतच्या विविध भागांतील कार्यकर्ते, युवक, विद्यार्थी, लेखक आणि विचारवंत या संमेलनात सहभागी होणार आहेत.
महात्मा जोतीराव फुले यांच्या जन्मद्विशताब्दी वर्षाचे औचित्य साधून आयोजित या संमेलनातून फुले-शाहू-आंबेडकर यांच्या समतावादी विचारांचा जागर करण्यात येणार आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी सुरू केलेल्या ‘जनता’ वृत्तपत्राच्या वैचारिक परंपरेला पुढे नेत लोकसंप संस्था गेल्या १३ वर्षांपासून ‘अवेक इंडिया’ नियतकालिक प्रकाशित करत आहे. सामाजिक प्रश्नांवर संवाद, वैचारिक देवाणघेवाण आणि सामूहिक परिवर्तनाला चालना देणे हा या संमेलनामागील मुख्य हेतू आहे.
संविधानाने दिलेली स्वातंत्र्य, समता, बंधुता, न्याय आणि मानवी प्रतिष्ठेची मूल्ये समाजातील सर्व घटकांपर्यंत पोहोचली आहेत का, यावर संमेलनात चर्चा होणार आहे. विशेषतः आदिवासी समाजाचे शिक्षण, आरोग्य, जल-जंगल-जमीन, मातृभाषा, संस्कृती, रोजगार आणि प्रतिनिधित्व यांसारख्या प्रश्नांवर विचारमंथन केले जाईल. गडचिरोलीसारख्या आदिवासीबहुल जिल्ह्यातील स्थानिक प्रश्नांना व्यापक व्यासपीठ मिळावे, तसेच युवकांना राज्यभरातील विचारवंतांशी संवाद साधता यावा, हा संमेलनाचा उद्देश आहे.
संमेलनात विविध वैचारिक सत्रांसह ‘जागर समतेचा’ शाहीरी जलसा आणि आदिवासी युवा संवादाचे आयोजन करण्यात आले आहे. प्रसिद्ध रॅपर बिपिन तातड यांच्या सादरीकरणातून वंचित समाजाचा इतिहास, संघर्ष, सांस्कृतिक वारसा आणि फुले-शाहू-बिरसा-आंबेडकरांचे विचार मांडले जाणार आहेत. प्रमुख वक्ते म्हणून डॉ. जितेंद्र मीणा, दादाभाऊ मडावी, ॲड. प्रियदर्शी तेलंग, प्रशांत रणदिवे, डॉ. संतोष सुरडकर आणि संदीप तेंडोलकर उपस्थित राहतील. तनुज पेंदोर आणि साधना मडावी आदिवासी युवा संवादात सहभागी होतील. संमेलनाचे अध्यक्षपद ॲड. बोधी रामटेके भूषविणार आहेत.
यावेळी मोफत करिअर मार्गदर्शन, उच्च शिक्षणविषयक माहिती आणि वनहक्क पट्ट्यांसंदर्भात मदत उपलब्ध करून दिली जाणार आहे. पुस्तकविक्री, बांबू हस्तकला, पारंपरिक वस्तू आणि खाद्यपदार्थांचे स्टॉल्सही उभारण्यात येतील. सामाजिक परिवर्तनासाठी योगदान देणाऱ्या दहा मान्यवरांना ‘जनता अवेक इंडिया पुरस्कार’ देऊन गौरविण्यात येणार आहे.
संमेलनाच्या पार्श्वभूमीवर गडचिरोली येथील शासकीय विश्रामगृहात आयोजित पत्रकार परिषदेत आयोजकांनी जिल्ह्यातील नागरिक, युवक, विद्यार्थी आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन केले.













