चंद्रपूर : २५ हजारांच्या लाचप्रकरणी महिला प्राचार्य, लिपिक एसीबीच्या जाळ्यात
– पाच महिन्यांचे मानधन काढण्यासाठी मागितली होती लाच
The गडविश्व
चंद्रपूर, दि. २३ : पाच महिन्यांचे प्रलंबित मानधन काढून देण्यासाठी २५ हजार रुपयांची लाच मागितल्याप्रकरणी पोंभुर्णा येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या महिला प्राचार्य आणि कनिष्ठ लिपिकाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) जाळ्यात ओढले. सोमवारी (२३ नोव्हेंबर) करण्यात आलेल्या सापळा कारवाईत कनिष्ठ लिपिकाला लाचेची रक्कम स्वीकारताना रंगेहात पकडण्यात आले, तर महिला प्राचार्यालाही ताब्यात घेण्यात आले.
कल्पना संजय खोब्रागडे असे महिला प्राचार्याचे, तर नरेंद्र मलीक असे कनिष्ठ लिपिकाचे नाव आहे. या प्रकरणातील तक्रारदार महिला पोंभुर्णा येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत तासिका तत्त्वावर शिल्प निदेशक म्हणून कार्यरत आहेत. त्यांचे पाच महिन्यांचे मानधन प्रलंबित होते. हे मानधन काढून देण्याच्या मोबदल्यात प्राचार्य खोब्रागडे यांनी सुरुवातीला ३० हजार रुपयांची मागणी केली होती. तडजोडीअंती २५ हजार रुपये स्वीकारण्याचे निश्चित झाले.
याबाबत तक्रारदार महिलेने एसीबीकडे धाव घेतली. त्यानुसार २२ नोव्हेंबर रोजी लाच मागणीची पडताळणी करण्यात आली. यावेळी प्राचार्यांनी लाचेची रक्कम कनिष्ठ लिपिक नरेंद्र मलीक याच्याकडे देण्यास सांगितले. मलीक यानेही लाच स्वीकारण्याची तयारी दर्शविल्याचे पडताळणीत निष्पन्न झाले.
त्यानंतर सोमवारी एसीबीच्या पथकाने संस्थेच्या परिसरात सापळा रचला. ठरल्याप्रमाणे तक्रारदार महिलेने २५ हजार रुपये मलीक याच्याकडे दिले. त्याने पंचांसमक्ष रक्कम स्वीकारताच एसीबीच्या पथकाने त्याला पकडले. या कारवाईनंतर महिला प्राचार्य खोब्रागडे यांनाही ताब्यात घेण्यात आले.
हक्काचे मानधन मिळवण्यासाठीही लाचेची मागणी झाल्याने या प्रकाराने शासकीय संस्थेतील कारभारावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. या प्रकरणी पोंभुर्णा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे कळते.
#thegdv #thegadvishva #gadchirolinews #gadchirolipolice # chandrpurnews #crimenews













