गडचिरोली : वांगेतुरीत पोलीस दलाचे आरोग्य शिबिर, १७० नागरिकांची तपासणी

6

गडचिरोली : वांगेतुरीत पोलीस दलाचे आरोग्य शिबिर; १७० नागरिकांची तपासणी
– अतिदुर्गम भागातील नागरिकांना मोफत आरोग्यसेवा व औषधोपचार; पुढील उपचारांसाठी २० जणांना रुग्णालयात जाण्याचा सल्ला
The गडविश्व
गडचिरोली, दि. २२ : अतिदुर्गम भागातील नागरिकांना आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने गडचिरोली पोलीस दलाच्या वतीने २२ नोव्हेंबर रोजी मौजा वांगेतुरी येथे मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिरात तज्ज्ञ वैद्यकीय पथकाने १७० नागरिकांची आरोग्य तपासणी करून आवश्यकतेनुसार मोफत औषधांचे वाटप केले. तर २० नागरिकांना पुढील उपचार व तपासणीसाठी विविध रुग्णालयांत जाण्याची शिफारस करण्यात आली.
गडचिरोली पोलीस दल, जिल्हा सामान्य रुग्णालय, जिल्हा परिषद गडचिरोली, केंद्रीय राखीव पोलीस दल (सीआरपीएफ) आणि शालिनीताई मेघे रुग्णालय, नागपूर यांच्या संयुक्त विद्यमाने हे शिबिर आयोजित करण्यात आले होते. पोलीस अधीक्षक एम. रमेश यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडलेल्या या उपक्रमात शालिनीताई मेघे रुग्णालयातील जनरल फिजिशियन डॉ. प्रदीप जोशी, नेत्ररोगतज्ज्ञ डॉ. सारंग डोंगरे, प्रांजल नागोसे तसेच नर्सिंग स्टाफने नागरिकांची तपासणी केली. यावेळी विविध आजार आणि पोषणविषयक समस्यांबाबत नागरिकांना मार्गदर्शनही करण्यात आले.
दरम्यान, गडचिरोली पोलीस दलाच्या वतीने २०२१ पासून आतापर्यंत २२६ आरोग्य मेळाव्यांचे आयोजन करण्यात आले असून, त्यातून ५० हजारांहून अधिक नागरिकांची आरोग्य तपासणी करण्यात आली आहे. तसेच सहा रक्तदान शिबिरांतून ४ हजार ८६४ युनिट रक्त संकलित करण्यात आले. ‘ऑपरेशन रोशनी’च्या माध्यमातून ९ हजार ९७१ हून अधिक नागरिकांची नेत्रतपासणी करण्यात आली असून, १ हजार ४१२ नागरिकांवर मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया करण्यात आल्या आहेत.
या शिबिरादरम्यान फिरत्या प्रदर्शनाच्या माध्यमातून गडचिरोली जिल्ह्यात कर्तव्य बजावताना शहीद झालेल्या जवानांचे बलिदान, सी-६० जवानांचे शौर्य तसेच पोलीस दलाच्या नागरी कृती उपक्रमांची माहिती देण्यात आली. यामुळे आरोग्यसेवेसोबतच पोलीस दलाच्या कार्याविषयी नागरिकांमध्ये जनजागृती करण्यात आली.
या उपक्रमासाठी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुहास गाडे, अपर पोलीस अधीक्षक कार्तिक मधिरा, गोकुल राज जी., हर्षवर्धन बी.जे. आणि सहायक पोलीस अधीक्षक सागर भामरे यांचे मार्गदर्शन लाभले. शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी वांगेतुरी पोलीस ठाण्याचे प्रभारी विश्वास पुल्लरवार, सीआरपीएफ १९१ बटालियनचे असिस्टंट कमांडंट मनोज कुमार, पोलीस निरीक्षक जितेंद्र कुमार आणि पोलीस अंमलदारांनी सहकार्य केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here