प्रारूप मतदार यादीतून नाव वगळले गेले? पुन्हा नोंदणीची संधी
– निवडणूक आयोगाचा महत्त्वपूर्ण निर्णय; ‘ASDD’ प्रवर्गातील मतदारांसाठी विशेष मोहीम
The गडविश्व
गडचिरोली, दि. १७ : विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रम (SIR)-२०२६ अंतर्गत प्रारूप मतदार यादीतून नाव वगळल्या गेलेल्या मतदारांसाठी निवडणूक आयोगाने पुन्हा एकदा नाव नोंदणीची संधी उपलब्ध करून दिली आहे. भारत निवडणूक आयोगाच्या ६ नोव्हेंबर २०२६ रोजीच्या निर्देशानुसार, अशा मतदारांना अंतिम मतदार यादीत नाव समाविष्ट करून घेण्यासाठी विशेष मोहीम राबविण्यात येणार आहे. त्यामुळे प्रारूप मतदार यादीत नाव नसलेल्या पात्र मतदारांना मोठा दिलासा मिळाला आहे.
विशेष सखोल पुनरीक्षण प्रक्रियेदरम्यान अनुपस्थित (Absent), स्थलांतरित (Shifted), मृत (Dead) आणि दुबार (Duplicate) अर्थात ‘ASDD’ प्रवर्गात नोंद झाल्यामुळे ज्या मतदारांचे गणना प्रपत्र प्राप्त झाले नव्हते, त्यांची नावे प्रारूप मतदार यादीत समाविष्ट होऊ शकली नाहीत. अशा मतदारांना पुन्हा संधी देण्यासाठी ही विशेष मोहीम हाती घेण्यात आली आहे. जिल्ह्यातील संबंधित मतदारांनी या संधीचा लाभ घेऊन आपली नावे अंतिम मतदार यादीत समाविष्ट करून घ्यावीत, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी अविश्यांत पंडा यांनी केले आहे.
मतदान केंद्रांवर प्रसिद्ध होणार याद्या
‘ASDD’ प्रवर्गातील मतदारांच्या मतदान केंद्रनिहाय याद्या संबंधित मतदान केंद्रे, ग्रामपंचायत, नगर परिषद आणि नगर पंचायत कार्यालयांच्या सूचना फलकांवर प्रसिद्ध करण्यात येणार आहेत. तसेच, या याद्या मुख्य निवडणूक अधिकारी, महाराष्ट्र राज्य यांच्या अधिकृत संकेतस्थळावर PDF स्वरूपात उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. त्यामुळे संबंधित मतदारांनी आपले नाव यादीत आहे किंवा नाही, याची खात्री करून घ्यावी.
गणना प्रपत्र पुन्हा सादर करण्याची सुविधा
संबंधित मतदारांनी मतदार नोंदणी अधिकारी (ERO), सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी (AERO) किंवा मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (BLO) यांच्याशी संपर्क साधून गणना प्रपत्र पुन्हा सादर करावे. हे प्रपत्र प्रत्यक्ष जमा करण्यासोबतच WhatsApp, ई-मेल, SMS तसेच ‘ECINET App’ द्वारेही सादर करता येणार आहे. जुन्या EPIC क्रमांकाच्या आधारे निवडणूक आयोगाच्या संकेतस्थळावरूनही गणना प्रपत्र डाउनलोड करण्याची सुविधा उपलब्ध आहे.
पत्ता बदलला नसेल तर परिशिष्ट-B, स्थलांतरितांसाठी परिशिष्ट-C
ज्या मतदारांनी आपले निवासस्थान बदललेले नाही, त्यांनी भरलेले व स्वाक्षरी केलेले गणना प्रपत्र ‘परिशिष्ट-B’ मधील घोषणापत्रासह संबंधित ERO, AERO किंवा BLO यांच्याकडे जमा करावे.
दरम्यान, राज्यांतर्गत स्थलांतर करून नवीन ठिकाणी वास्तव्यास गेलेल्या मतदारांनी नवीन पत्ता आणि विधानसभा मतदारसंघाचा तपशील नमूद करावा. तसेच ‘परिशिष्ट-C’ मधील घोषणापत्र, गणना प्रपत्र आणि पत्त्याच्या पुराव्यासह अर्ज नवीन मतदारसंघातील ERO किंवा AERO यांच्याकडे सादर करावा. या प्रक्रियेसाठी स्वतंत्रपणे नमुना ८ भरण्याची आवश्यकता नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
बेघर मतदारांनाही मिळणार दिलासा
ज्या बेघर मतदारांकडे निवासस्थानाचा कोणताही अधिकृत पुरावा उपलब्ध नाही, अशा मतदारांसाठीही विशेष तरतूद करण्यात आली आहे. संबंधित प्रकरणांमध्ये मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (BLO) यांचा प्रत्यक्ष क्षेत्र पडताळणी अहवाल ग्राह्य धरला जाणार आहे. त्यामुळे पत्त्याचा पुरावा नसल्यामुळे पात्र मतदारांना नोंदणीपासून वंचित राहावे लागणार नाही.
BLO घरोघरी जाऊन साधणार संपर्क
मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी BLO मार्फत विशेष संपर्क मोहीम राबविण्यात येणार आहे. याअंतर्गत BLO घरोघरी भेट देऊन संबंधित मतदार, त्यांचे कुटुंबीय, शेजारी तसेच उपलब्ध संपर्क क्रमांकांच्या माध्यमातून माहिती मिळविणार आहेत. या कामात राजकीय पक्षांच्या मतदान केंद्रस्तरीय अभिकर्त्यांचे (BLA) सहकार्यही घेतले जाणार आहे.
याशिवाय, मतदारांना ‘ECINET App’ तसेच निवडणूक आयोगाच्या संकेतस्थळावरील ‘Book a Call with BLO’ या सुविधेद्वारे थेट संबंधित अधिकाऱ्यांशी संपर्क साधता येणार आहे. प्राप्त झालेल्या अर्जांची योग्य पडताळणी करून पात्र मतदारांची नावे अंतिम मतदार यादीत समाविष्ट केली जातील, अशी माहिती उपजिल्हाधिकारी (निवडणूक) राहुल जाधव यांनी दिली.
मतदार यादीत नाव नसल्यास दुर्लक्ष करू नका; तातडीने संबंधित निवडणूक अधिकाऱ्यांशी संपर्क साधून नोंदणीची ही संधी अवश्य साधा













