गडचिरोलीत माओवाद्यांचा जमिनीत पुरलेला शस्त्रसाठा जप्त; ३१ जिवंत काडतुसांसह स्फोटक साहित्य हस्तगत
– हिक्केर जंगल परिसरात पोलिसांची मोठी कारवाई; दोन अग्निशस्त्रे, ग्रेनेड, बीजीएल सेल आणि लाँचर जप्त
The गडविश्व
गडचिरोली, दि. १७ : माओवाद्यांनी सुरक्षा दलांवर घातपात घडवून आणण्याच्या उद्देशाने जंगलात जमिनीखाली लपवून ठेवलेला शस्त्रसाठा आणि स्फोटक साहित्य गडचिरोली पोलिसांनी जप्त केले आहे. १७ नोव्हेंबर रोजी करण्यात आलेल्या या कारवाईत दोन अग्निशस्त्रे, ३१ जिवंत काडतुसे, तीन ग्रेनेड, १८ बीजीएल सेल, दोन बीजीएल लाँचर, १० डेटोनेटर यासह मोठ्या प्रमाणात माओवादी साहित्य हस्तगत करण्यात आले.
गडचिरोली जिल्ह्यातील पोस्टे गर्देवाडा हद्दीतील हिक्केर जंगल परिसरात माओवाद्यांनी स्फोटक साहित्य जमिनीत लपवून ठेवल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलीस अधीक्षक एम. रमेश यांच्या मार्गदर्शनाखाली १७ नोव्हेंबर रोजी विशेष शोधमोहीम राबविण्यात आली. यासाठी गडचिरोली व प्राणहिता येथील विशेष अभियान पथकांच्या पाच तुकड्या आणि बीडीडीएसची दोन पथके रवाना करण्यात आली होती.
जंगल परिसरात कसून शोध घेतल्यानंतर बीडीडीएस पथकाच्या मदतीने जमिनीत लपवून ठेवलेला शस्त्रसाठा शोधून काढण्यात आला. यामध्ये एक १२ बोर रायफल, एक एअरगन रायफल, .३०३ चे १३ आणि ८ एम.एम.चे १८ जिवंत काडतुसे, तीन ग्रेनेड, १८ बीजीएल सेल, दोन बीजीएल लाँचर, १० डेटोनेटर, २१ सुराका सेल, होंडा कंपनीचे एक इलेक्ट्रिक जनरेटर आणि वायरचे २२ बंडल यासह इतर माओवादी साहित्य जप्त करण्यात आले.
भूतकाळात सुरक्षा दलांवर घातपात घडवून आणण्यासाठी तसेच नक्षल सप्ताह आणि निवडणुकीच्या काळात हिंसक कारवाया करण्यासाठी माओवादी दुर्गम जंगल परिसराचा फायदा घेत शस्त्रे व स्फोटक साहित्य जमिनीत लपवून ठेवत असत. अशा प्रकारे लपवून ठेवलेला शस्त्रसाठा शोधून नष्ट करण्याच्या दृष्टीने पोलिसांकडून ही कारवाई करण्यात आली.
ही कारवाई अपर पोलीस अधीक्षक (अभियान) कार्तिक मधीरा, अपर पोलीस अधीक्षक गोकुल राज जी., अपर पोलीस अधीक्षक अहेरी (प्राणहिता) हर्षवर्धन बी. जे. आणि पोलीस उपअधीक्षक (अभियान) सुनील उईके यांच्या देखरेखीखाली विशेष अभियान पथक, प्राणहिता, इंटेलिजन्स सेल आणि बीडीडीएस पथकातील जवानांनी यशस्वीपणे पार पाडली. पोलीस अधीक्षक एम. रमेश यांनी या कारवाईत सहभागी जवानांचे कौतुक केले.
#thegdv #thegadvishva #gadchirolinews #gadchirolipolice #Gadchiroli #GadchiroliPolice #Maoist #MaoistOperation #ExplosivesSeized #ArmsSeized #PoliceOperation #MaharashtraPolice #AntiNaxalOperation













