विसोरा–शंकरपूर नदीपुलाच्या जोडावर रस्ता उखडला; डागडुजीनंतरही अपघाताचा धोका कायम
– तात्पुरत्या मलमपट्टीने समस्या जैसे थे; खड्डे बुजविताना तयार झाले उंचवटे, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कामावर प्रश्नचिन्ह
The गडविश्व
ता.प्र/देसाईगंज, दि. १७ : रस्त्यांवरील खड्डे बुजविण्याच्या नावाखाली केल्या जाणाऱ्या वरवरच्या डागडुजीमुळे वाहनधारकांची डोकेदुखी कमी होण्याऐवजी वाढत असल्याचे चित्र आहे. विसोरा–शंकरपूर मार्गावरील नदीपुलाच्या जोडावरील रस्ता उखडून पुन्हा धोकादायक बनला आहे. यापूर्वी डागडुजी करूनही परिस्थिती जैसे थे असल्याने सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कामाच्या दर्जावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. खड्ड्यांसोबतच डागडुजी केलेल्या ठिकाणी तयार झालेले उंचवटेही अपघातांना निमंत्रण देत आहेत.
विसोरा–शंकरपूर मार्गावरील नदीपुलाच्या सुरुवातीलाच असलेल्या आडव्या जोडावरील रस्त्याचा पृष्ठभाग उखडून खचला आहे. त्यामुळे या ठिकाणी उंच-सखल भाग तयार झाला असून, पुलावरून ये-जा करणाऱ्या वाहनचालकांना मोठी कसरत करावी लागत आहे. विशेषतः दुचाकीस्वारांसाठी हा भाग धोकादायक ठरत आहे. रात्रीच्या वेळी रस्त्याची ही अवस्था लक्षात न आल्यास वाहनावरील नियंत्रण सुटून अपघात होण्याची शक्यता आहे.
या समस्येबाबत यापूर्वी आमदार रामदास मसराम यांनी याच मार्गाने प्रवास करताना सार्वजनिक बांधकाम विभागाचे लक्ष वेधले होते. त्यानंतर संबंधित ठिकाणी काही प्रमाणात डागडुजी करून खड्डे बुजविण्यात आले. मात्र, काही काळातच पुन्हा रस्ता उखडल्याने या डागडुजीचा उपयोग किती झाला, असा प्रश्न उपस्थित होत आहे. वारंवार डागडुजी करूनही समस्या कायम राहत असल्याने वाहनधारकांमध्ये नाराजी आहे.
दरम्यान, वडसा–कुरखेडा मार्गाचीही दुरवस्था झाली आहे. या मार्गावर अनेक ठिकाणी मोठमोठे खड्डे पडले असून, शंकरपूर बसस्थानक परिसरातील रस्ताही खराब झाला आहे. वडसा ते अर्जुनी मोरगाव फाट्यादरम्यानही खड्ड्यांमुळे वाहनचालकांना त्रास सहन करावा लागत आहे.
खड्डे बुजवले की उंचवटे तयार केले?
विशेष म्हणजे, काही ठिकाणी खड्डे बुजविण्यात आले असले तरी डागडुगी करताना रस्त्याचा समतोल राखण्यात आलेला नाही. त्यामुळे डागडुजी केलेला भाग मूळ रस्त्याच्या पातळीपेक्षा उंच राहून उंचवटे तयार झाले आहेत. कुरखेडा नजीकच्या एका धाब्याजवळही अशाच प्रकारे खड्डे बुजविण्यात आले असून, या ठिकाणी वाहनांना जोरदार धक्के बसत आहेत. म्हणजेच खड्ड्यांचा धोका कमी करण्याऐवजी चुकीच्या पद्धतीच्या डागडुजीमुळे नवाच धोका निर्माण झाला आहे. काही ठिकाणी डागडुजीनंतर धुळीचे साम्राज्यही पसरले आहे.
तात्पुरत्या मलमपट्टीने अपघातांचा धोका कसा टळणार?
एकाच ठिकाणी वारंवार खड्डे पडत असतील आणि डागडुजी केलेल्या भागातच उंचवटे तयार होत असतील, तर संबंधित कामांच्या गुणवत्तेची तपासणी होणार कधी? सार्वजनिक बांधकाम विभागाने विसोरा–शंकरपूर नदीपुलाच्या जोडाची तांत्रिकदृष्ट्या योग्य पद्धतीने दुरुस्ती करण्यासह वडसा–कुरखेडा मार्गावरील खड्डे आणि उंचवट्यांचाही कायमस्वरूपी बंदोबस्त करणे गरजेचे आहे. केवळ वरवरची डागडुजी करून जबाबदारी झटकण्याऐवजी दर्जेदार काम करण्याकडे विभागाने लक्ष द्यावे. एखादी गंभीर दुर्घटना घडल्यानंतरच प्रशासनाला जाग येणार का, असा सवाल वाहनधारकांकडून उपस्थित केला जात आहे.
#thegdv #thegadvishva #gadchirolinews
#VisoraShankarpur #Gadchiroli #Desaiganj #RoadSafety #DamagedRoads #BridgeSafety #PublicWorksDepartment #PWD #RoadMaintenance #Potholes #AccidentRisk #RoadInfrastructure #MaharashtraNews #TheGadvishva













