रेल्वे रुळावर वाघाचा मृत्यू; वन्यजीवांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर

8

रेल्वे रुळावर वाघाचा मृत्यू; वन्यजीवांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर
– तिरोडी-बालाघाट मार्गावर मालगाडीची धडक
The गडविश्व
तुमसर (भंडारा), दि. १७ : जंगलातून जाणाऱ्या रेल्वे मार्गावर वन्यजीवांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. दक्षिण पूर्व मध्य रेल्वेच्या नागपूर विभागांतर्गत तिरोडी-बालाघाट रेल्वे मार्गावर १५ नोव्हेंबर रोजी सकाळी मालगाडीच्या धडकेत एका वाघाचा मृत्यू झाला. या घटनेमुळे वन्यजीवांच्या अधिवासातून जाणाऱ्या रेल्वे मार्गांवरील सुरक्षेचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे.
तुमसर-कटंगी-बालाघाट रेल्वे मार्गावरील गोबरवाही ते कटंगी दरम्यानचा सुमारे १८ किलोमीटरचा परिसर घनदाट जंगलाने व्यापलेला आहे. या भागात वाघ, हरिण, नीलगाय, रानडुक्कर, मोर यांसह विविध वन्यजीवांचा वावर असतो. नैसर्गिक अधिवासात भ्रमंती करताना वन्यप्राण्यांना रेल्वे रुळ ओलांडावे लागतात. मात्र, या मार्गावरून वेगाने धावणाऱ्या मालगाड्यांमुळे वन्यजीवांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे.

वेगमर्यादा ताशी ४० किलोमीटर करण्याची मागणी

वन्यजीवांचा वावर असलेल्या या संवेदनशील रेल्वे मार्गावर गाड्यांची वेगमर्यादा ताशी ४० किलोमीटर करण्याची मागणी होत आहे. रेल्वे आणि वन विभागाने संयुक्त सर्वेक्षण करून वन्यजीवांच्या हालचालींची ठिकाणे निश्चित करावीत. तसेच धोकादायक ठिकाणी सावधानतेचे फलक, विशेष सिग्नल आणि सीसीटीव्ही कॅमेरे बसवावेत. लोको पायलटांना या वनपट्ट्यातून जाताना विशेष सतर्कतेच्या सूचना देण्याची गरजही व्यक्त होत आहे.

दोन वर्षांपूर्वीही याच दिवशी वाघ जखमी

विशेष म्हणजे, १५ नोव्हेंबर २०२४ रोजी गोबरवाही ते डोंगरी बुजुर्ग रेल्वे स्थानकादरम्यान रेल्वेच्या धडकेत एक वाघ जखमी झाला होता. त्यानंतर १५ नोव्हेंबर २०२६ रोजी पुन्हा वाघाचा मृत्यू झाल्याने या घटनांचे गांभीर्य वाढले आहे. वारंवार घडणाऱ्या अशा घटनांमुळे रेल्वे प्रशासन आणि वन विभागाच्या वन्यजीव संरक्षण उपाययोजनांवर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे.
रेल्वे वाहतूक आणि विकास महत्त्वाचा असला, तरी वन्यजीवांच्या जीवाची किंमत मोजून तो साधला जाऊ नये. भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी संबंधित यंत्रणांनी केवळ पाहणी न करता ठोस प्रतिबंधात्मक उपाययोजना राबवाव्यात, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
#thegdv #thegadvishva #bhandara #TigerDeath #TirodiBalaghatRailway #WildlifeProtection #WildlifeSafety #RailwayAccident #TigerConservation #ForestConservation #Gondia #Bhandara #MaharashtraNews #IndianRailways #WildlifeConservation

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here