भगवान बिरसा कलासंगम 2.0 या भव्य सांस्कृतिक सोहळ्याचे थेट प्रक्षेपण (LIVE)
नक्षलग्रस्त गडचिरोलीत जागतिक कौशल्य अकादमीचे उद्घाटन; २,५०० युवकांना रोजगाराची संधी
– मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते बोदली येथे लॉयड्सच्या कौशल्य केंद्राचे लोकार्पण
The गडविश्व
गडचिरोली, दि. १५ : एकेकाळी नक्षलवादामुळे ओळखल्या जाणाऱ्या गडचिरोली जिल्ह्याला आता जागतिक कौशल्य आणि रोजगाराचे केंद्र बनविण्याच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल पडले आहे. बोदली येथे लॉयड्स मिशन फॉर ग्लोबल स्किल अँड एंटरप्रेन्योरशिप (LMGSE) या जागतिक दर्जाच्या कौशल्य अकादमीचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते १५ नोव्हेंबर रोजी करण्यात आले. या अकादमीच्या माध्यमातून आतापर्यंत २,५०० हून अधिक स्थानिक युवकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध झाल्या असून, प्रस्तावित २० हजार कोटी रुपयांच्या गुंतवणुकीमुळे जिल्ह्याच्या औद्योगिक आणि आर्थिक विकासाला नवी दिशा मिळण्याची अपेक्षा आहे.
लॉयड्स मेटल्स अँड एनर्जी लिमिटेडच्या (LMEL) कॉर्पोरेट सामाजिक दायित्वांतर्गत उभारण्यात आलेल्या या अकादमीचा मुख्य उद्देश स्थानिक युवकांना उद्योगांच्या गरजेनुसार कौशल्य प्रशिक्षण देऊन राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर रोजगारक्षम बनविणे हा आहे. या उद्घाटन सोहळ्याला केंद्रीय आदिवासी कार्यमंत्री जुएल ओराम, खासदार नामदेव किरसान, पद्मश्री तुलसी मुंडा, आमदार धर्मराव बाबा आत्राम, डॉ. मिलिंद नारोटे, पोलीस अधीक्षक एम. रमेश, लॉयड्स मेटल्सचे व्यवस्थापकीय संचालक बी. प्रभाकरन यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते.
गडचिरोलीतील युवकांना जागतिक रोजगाराच्या संधी
अकादमीच्या पाहणीनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी येथील पायाभूत सुविधा आणि प्रशिक्षण व्यवस्थेचे कौतुक केले. जागतिक दर्जाच्या संस्थांच्या तोडीस तोड सुविधा येथे उपलब्ध असून, या माध्यमातून गडचिरोलीतील युवकांना जगातील विविध देशांमध्ये रोजगार मिळविण्याची क्षमता प्राप्त होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
लॉयड्सचे व्यवस्थापकीय संचालक बी. प्रभाकरन यांनी गडचिरोलीत औद्योगिक विकासासाठी दाखविलेली दूरदृष्टी आणि स्थानिकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी केलेल्या प्रयत्नांचेही मुख्यमंत्र्यांनी कौतुक केले. हिंसेचा मार्ग सोडून मुख्य प्रवाहात येणाऱ्या नागरिकांच्या पुनर्वसनासाठी कंपनीचे योगदान महत्त्वपूर्ण असल्याचे त्यांनी नमूद केले.
सुरजागड येथील खाणकामाच्या शाश्वत पद्धतींचा उल्लेख करताना मुख्यमंत्र्यांनी पर्यावरणाचे संतुलन राखून औद्योगिक विकास करण्यावर भर दिला. स्थानिक आदिवासी विद्यार्थ्यांना खाणकामाचे उच्च शिक्षण घेण्यासाठी ऑस्ट्रेलियातील कर्टिन विद्यापीठात पाठविण्यात येत असल्याची माहितीही त्यांनी दिली. गडचिरोलीला भविष्यात ‘भारताचे ग्रीन स्टील हब’ बनविण्याचा संकल्पही त्यांनी व्यक्त केला.
२० हजार कोटींची गुंतवणूक; युवकांसाठी मोठी स्वप्ने
लॉयड्स मेटल्सचे व्यवस्थापकीय संचालक बी. प्रभाकरन यांनी यावेळी गडचिरोलीच्या विकासाचा महत्त्वाकांक्षी आराखडा मांडला. जिल्ह्यात सुमारे २० हजार कोटी रुपयांची गुंतवणूक प्रस्तावित असून, त्यामध्ये १० हजार कोटी रुपयांच्या विशेष प्रकल्पाचाही समावेश असल्याचे त्यांनी सांगितले.
कंपनीने आतापर्यंत ४,५०० जणांना प्रशिक्षण देऊन रोजगार उपलब्ध करून दिल्याचा दावा त्यांनी केला. गडचिरोलीतील युवक भविष्यात अभियंते, डॉक्टर, व्यावसायिक आणि वैमानिक म्हणून जागतिक स्तरावर आपली ओळख निर्माण करतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. लॉयड्स सक्षम उपक्रमाच्या माध्यमातून स्थानिक युवकांना इंडिगोमध्ये व्यावसायिक वैमानिक होण्याची संधी उपलब्ध करून देण्याचेही नियोजन असल्याचे त्यांनी सांगितले.
पाच महिलांना पापुआ न्यू गिनीमध्ये प्रशिक्षणाची संधी
या सोहळ्यात हेडरी येथील लॉयड्स वन्या वस्त्रनिर्मिती केंद्रात कार्यरत असलेल्या पाच महिलांना पापुआ न्यू गिनी येथे जाण्यासाठी बोर्डिंग पास प्रदान करण्यात आले. या महिला तेथील बोगनविल भागातील महिलांना शिवणकाम आणि वस्त्रनिर्मितीचे प्रशिक्षण देणार आहेत. गडचिरोलीतील महिलांच्या कौशल्याला आंतरराष्ट्रीय स्तरावर मिळालेली ही संधी विशेष ठरली. याशिवाय कंपनीच्या कर्मचारी समभाग मालकी योजनेअंतर्गत (ESOP) कर्मचाऱ्यांनाही कंपनीचे समभाग प्रदान करण्यात आले.
प्रशिक्षण, निवास आणि विद्यावेतन मोफत
बोदली येथील LMGSE अकादमीमध्ये एक हजाराहून अधिक विद्यार्थ्यांच्या निवासाची व्यवस्था असलेली निवासी सुविधा आहे. येथे वेल्डिंग, इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग, खाणकाम, लॉजिस्टिक्स, वेअरहाऊस व्यवस्थापन, ड्रायव्हिंग, हॉस्पिटॅलिटी, हाऊसकीपिंग आणि रिटेल व्यवस्थापन अशा विविध क्षेत्रांमध्ये प्रशिक्षण दिले जाते.
विशेष म्हणजे प्रशिक्षणार्थ्यांना प्रशिक्षण काळात विद्यावेतन दिले जाते. भोजन, निवास आणि प्रशिक्षणाचा खर्चही पूर्णपणे मोफत आहे. अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर त्याच दिवशी अप्रेंटिसशिप नियुक्तीपत्र देण्याची व्यवस्था असल्याचे कंपनीकडून सांगण्यात आले.
जागतिक खाणकाम उपकरण निर्मिती क्षेत्रातील आघाडीची कंपनी FLSmidth सोबतही LMGSE ने धोरणात्मक भागीदारी केली आहे. या भागीदारीअंतर्गत भारतातील कंपनीची पहिली कार्यशाळा अकादमी परिसरात सुरू होणार असून, विद्यार्थ्यांना आधुनिक खाणकाम तंत्रज्ञानाचे प्रत्यक्ष प्रशिक्षण मिळणार आहे.
आरोग्य आणि सामाजिक विकासावरही भर
औद्योगिक प्रशिक्षणासोबतच कंपनीकडून आरोग्य, शिक्षण आणि महिला सक्षमीकरणासाठी विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. कंपनीच्या प्रादेशिक रुग्णालयात अत्याधुनिक रोबोटिक शस्त्रक्रियेची सुविधा उपलब्ध असल्याची माहिती प्रभाकरन यांनी दिली. तसेच लॉयड्स सक्षम, सखी कार्यक्रम, गुणवंत विद्यार्थ्यांना आर्थिक मदत आणि इंटर्नशिपच्या माध्यमातून सामाजिक विकासाला चालना दिली जात आहे.
एकंदरीत, नक्षलग्रस्त अशी ओळख असलेल्या गडचिरोलीतील युवकांना स्थानिक पातळीवर कौशल्य प्रशिक्षण देऊन जागतिक रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याचा लॉयड्सचा हा उपक्रम जिल्ह्याच्या विकासाच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण मानला जात आहे. मात्र, या गुंतवणुकीचा आणि औद्योगिक विस्ताराचा लाभ जिल्ह्यातील अधिकाधिक स्थानिक युवकांना मिळतो का, याकडे आता लक्ष लागले आहे.
#thegdv #thegadvishva #gadchirolinews #gadchirolipolice #Gadchiroli #LloydsMetals #SkillDevelopment #DevendraFadnavis #Employment #TribalDevelopment #GlobalSkills #IndustrialDevelopment #Maharashtra #YouthEmpowerment













