पाळण्यातही सुरक्षित नाहीत चिमुकले! बिबट्याच्या हल्ल्यात सहा महिन्यांच्या बाळाचा मृत्यू

3

भगवान बिरसा कलासंगम 2.0 या भव्य सांस्कृतिक सोहळ्याचे थेट प्रक्षेपण (LIVE)

पाळण्यातही सुरक्षित नाहीत चिमुकले! बिबट्याच्या हल्ल्यात सहा महिन्यांच्या बाळाचा मृत्यू
– आई स्वयंपाक करीत असताना बिबट्याची घरात घुसखोरी; बाळाला उचलून तुरीच्या शेतात नेले
The गडविश्व
भंडारा, दि.१५ : घरातील पाळण्यात निवांत झोपलेल्या अवघ्या सहा महिन्यांच्या चिमुकल्यावर बिबट्याने झडप घालून त्याला उचलून नेल्याची धक्कादायक घटना तिर्री गावात घडली. आई स्वयंपाक करीत असतानाच बिबट्याने घरात प्रवेश करून बाळाला पाळण्यातून उचलले. आईने आरडाओरड करीत पाठलाग केला मात्र बिबट्या बाळाला घेऊन जवळच्या तुरीच्या शेतात पसार झाला. ग्रामस्थांच्या शोधमोहिमेनंतर बिबट्याने बाळाला सोडले परंतु तोपर्यंत त्याचा मृत्यू झाला होता. या घटनेने संपूर्ण गावावर शोककळा पसरली आहे.
मिन्सी–तिर्री मार्गावरील तिर्री येथे शुक्रवारी सायंकाळी साडेसहाच्या सुमारास ही काळीज पिळवटून टाकणारी घटना घडली. अद्विक अभिमन बोंदरे असे मृत बालकाचे नाव आहे. अभिमन बोंदरे यांचा सहा महिन्यांचा मुलगा अद्विक घरातील पाळण्यात झोपला होता. त्याची आई हेमलता बोंदरे स्वयंपाक करीत असताना अचानक बिबट्या घरात शिरला. क्षणाचाही विलंब न करता त्याने पाळण्यात झोपलेल्या बाळाला उचलले आणि घराबाहेर धूम ठोकली.
हा प्रकार लक्षात येताच हेमलता यांनी आरडाओरड करीत बिबट्याचा पाठलाग केला. मात्र, बिबट्या बाळाला घेऊन जवळच असलेल्या तुरीच्या शेतात शिरला. आवाज ऐकून ग्रामस्थ घटनास्थळी धावले. त्यांनी परिसरात शोध सुरू केला असता बिबट्या बालकासह शेतात असल्याचे दिसून आले.
जवळपास अर्ध्या तासाच्या थरारानंतर बिबट्याने बालकाला सोडले. मात्र, दुर्दैवाने तोपर्यंत चिमुकल्याचा मृत्यू झाला होता. आईच्या डोळ्यांदेखत घडलेल्या या घटनेने कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून, गावात शोकमय वातावरण निर्माण झाले आहे.
घटनेची माहिती मिळताच वनविभागाचे अधिकारी आणि पोलीस प्रशासन घटनास्थळी दाखल झाले. पुढील कार्यवाही सुरू करण्यात आली आहे. दरम्यान, बिबट्याने थेट घरात घुसून बालकावर हल्ला केल्याने परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. बिबट्याचा तातडीने बंदोबस्त करावा, गाव परिसरात वनविभागाची गस्त वाढवावी आणि नागरिकांच्या सुरक्षेसाठी प्रभावी उपाययोजना कराव्यात, अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here